व्यक्तीविशेष
बाळासाहेब ठाकरे एक सच्चा मराठी माणूस !
-संजयकुमार जोशी
पुण्यातील दैनिक सकाळचा राजीनामा दिला आणि मुंबई गाठली. सन १९९६ साली युतीचे म्हणजेच शिवसेना भाजपा मित्रपक्षांचं राज्यात सरकार सत्तेवर होतं. मा. शिवसेना संस्थापक आणि प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या मार्गदर्शनाखाली सरकार दरबारी सर्व हालचाली, विकासयोजना चालतं असतं. या काळात मला मातोश्री वर प्रत्यक्ष भेट घेण्यासाठी बाळासाहेब यांनी बोलावून घेतलं होतं. कारण होतं की मी सामना, महाराष्ट्र टाईम्स मधुन त्यांच्या अत्यंत महत्त्वाचा भाग असलेल्या शिवशाही घरकुल योजनेचा लाभ सर्वसामान्य मराठी नागरिकांना कसा केला जात आहे याबद्दल दोन पेजेस विशेष पुरवणीचे नियोजन केले होते. छत्रपती संभाजीनगरचे खंदे शिवसैनिक व माझे स्नेही, मित्र चंद्रकांत खैरे त्यावेळी राज्यात गृहनिर्माण मंत्री होते. त्यांच्या खात्यावर विस्तार पुर्वक माहिती घेऊन मुबंई शहरातील विविध योजना राबविण्यात येत असल्याबद्दल माहिती व रंगीत छायाचित्रासह या पूरवणीमध्ये मा बाळासाहेब यांच्या बद्दल विस्तृत असा लेख लिहिला होता.
मातोश्रीवरुन बोलावणं म्हणजे मनात धाकधूक होती आणि आपलं काही चुकलं की काय असं वाटतं होतं. वारंवार पुरवणीमधील मजकूर, छायाचित्रे पाहून घेतली आणि भेटलो. त्यांनी भेदक नजरेने पाहिलं आणि ही पुरवणी प्रसिद्ध करण्याचं प्रयोजन काय आहे आणि हे कोणी तुम्हाला सांगितले आहे असे विचारले. मी काहीच विचार केला नव्हता, या आकस्मिक प्रश्नांची उकल कशी करायची हे ध्यानीमनी नसताना सहजपणे बोललो की, युती सरकार असतांना म्हणावी तशी वृत्तपत्रात विकासयोजनास प्रसिद्धी मिळत नाही आणि मी दै सकाळचा राजीनामा देऊन हे काम करण्याची जबाबदारी स्वीकारली आहे, असं म्हणालो.
मा. बाळासाहेब यांनी खालीवर मला न्याहाळत जवळ बोलावले आणि पाठीवर हात फिरवून अरे व्वा! तर जोशी तुम्ही शिवसैनिक झाला आहात, याला काय मदत हवी ती द्यावी आणि करा योजनांची प्रसिद्धी, सर्वसामान्य लोकांना, बारा बलुतेदाराना कळूदे त्यांचं हक्काचं सरकार किती महत्वाचे कार्य त्यांच्यासाठी करीत आहे ते! असं म्हणाले. त्यांनी माझी राहण्याची व्यवस्था मनोरामध्ये स्वतंत्र पणे करण्यात यावी म्हणून तेव्हाचे सार्वजनिक बांधकाम मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे कळवलं आणि व्यवस्था करण्यात आली. मी शतशः भरभरून पावलो, या पहिल्या भेटीत मला दाद पण मिळाली आणि आशीर्वाद पण!
त्यापूर्वी संभाजी नगरची महापालिका स्थापना करण्यात आली तेव्हा पहिल्या निवडणुकीत शिवसेना पक्ष म्हणून जोरदार तयारी केली होती. मी पुण्यातील दै सकाळच्या विभागीय कार्यालयात कार्यरत असतांना गुलमंडी जवळ सिंगापूर कॉमप्लेक्सला वरच्या मजल्यावर गोमतगिरी म्हणून हॉटेलमध्ये त्यावेळी शिवसेना नेते मुबंई येथून प्रचारासाठी आले की उतरत असतं. मधुकर प्रभुदेसाई, प्रमोद भानुशाली, मनोहर जोशी, दादा कोंडके अशी अनेक नेते मंडळी असतं. या हॉटेलमध्ये व्यवस्थापक म्हणून नेव्ही रिटायर्ड कुळकर्णी म्हणून काम पाहात असतं. मातोश्री वरुन त्यांना फोनवर कायम माहिती देण्यासाठी कळवलं होतं, त्यांनी मला यासाठी मदतीला घेतले होते. दिवसभर काय घडले आहे आणि सभा, लोक याचा प्रतिसाद, प्रचारात विरोधी पक्षांनी काय मुद्दे घेतले अशी माहिती द्यायचो. त्यावेळी अचानक झालेल्या दंगलीची माहिती फोनवरून स्वतः मा. बाळासाहेब यांनी घेतली होती, त्याची आठवण पण मी पहिल्या भेटीत त्यांच्या कानावर घातली. तेव्हा त्यांनी अरे हो, तुम्ही तर आमचे रिपोर्टर कुळ-जोशी आणि हात पुढे करुन हस्तांदोलन केलं.
त्यानंतर दुसऱ्या भेटीत टाईम्स ऑफ इंडियामध्ये मा बाळासाहेब यांच्या वाढदिवसानिमित्त १६ पानी विशेष पुरवणी भेटायचा योग जुळून आला होता. प्रा मधु दंडवते, जार्ज फर्नांडिस, मनोहर जोशी ते दादा कोंडके आदींचे बाळासाहेब यांच्या बद्दल असलेल्या अनेक आठवणी व अनुभव लेखस्वरूपात प्रसिध्द केल्या होत्या. त्याबद्दल पण आमच्या पीएनफआय या फीचर्स एजन्सीच्या टीमचं अभिनंदन पण केलं होतं.
मा बाळासाहेब ठाकरे यांची भेट त्यानंतरच्या काळात मी पुणे येथील दै सामना वृत्तपत्रात सहाय्यक व्यवस्थापक म्हणून कार्यरत असताना झाली होती. त्यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विशेष पुरवणी प्रसिद्ध केली होती. विशेषतः न भुतो न भविष्यती! या म्हणीप्रमाणे ही पुरवणी ११० पानांची भरगच्च अशी झाली होती. मी जाहिरात प्रमुख म्हणून काम केले होते त्यामुळे मुबंई कार्यालयात बैठकीला गेलो होतो आणि त्यानंतर मातोश्रीला जाऊन बसलो होतो. मला बोलावलं गेलं, मा बाळासाहेब यांनी कौतुक केलं आणि माझ्या लक्षणीय कार्याबद्दल ₹.१००१/- चं पाकीट बक्षीस म्हणून दिलं होतं.
अत्यंत सहृदयी सच्चा मराठी माणूस म्हणून मला व्यक्तिशः मा बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल प्रचंड आदर वाटतो. मराठी माणसाच्या आयुष्यात बाळासाहेब ठाकरे यांच्या रूपाने एक झंझावात आलेला होता आणि तो कायमस्वरूपी मनात खोलवर आहे, त्यांच्या स्मृतीला विनम्रपणे दंडवत!
बाळ केशव ठाकरे ऊर्फ बाळासाहेब ठाकरे हे महाराष्ट्रातील शिवसेना पक्षाचे संस्थापक, राजकारणी व व्यंगचित्रकार होते. सामना या मराठी दैनिकाचे हे संस्थापक, तसेच प्रमुख संपादकही होते. ठाकरेंनी सर्वप्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली.
बाळासाहेबांचा जन्म 23 जानेवारी 1926 रोजी पुण्यात केशव सीताराम ठाकरे यांच्या पोटी झाला होता. त्यांचे वडील एक पुरोगामी सामाजिक कार्यकर्ते आणि लेखक होते जे जातिव्यवस्थेचे कट्टर विरोधक होते. त्यांनी महाराष्ट्रातील मराठी भाषिक लोकांना संघटित करण्यासाठी संयुक्त मराठी चळवळ मध्ये प्रमुख भूमिका बजावली आणि 1950 च्या दशकात मुंबईला महाराष्ट्राची राजधानी बनवण्यासाठी बरेच काम केले आहे.
बाळासाहेबांचा विवाह मीना ठाकरे यांच्याशी झाला होता. त्यांच्यापासून त्यांना बिंदुमाधव, जयदेव आणि उद्धव ठाकरे असे तीन पुत्र झाले. त्यांची पत्नी मीना आणि मोठा मुलगा बिंदुमाधव 1996 मध्ये मरण पावले.
ठाकरेंनी सर्वप्रथम एक व्यंगचित्रकार म्हणून सामाजिक प्रश्नांवर भाष्य करण्यास सुरुवात केली. इ.स. 1950 मध्ये ते ‘फ्री प्रेस जर्नल’ मध्ये व्यंगचित्रकार म्हणून रुजू झाले. पुढील काळात त्यांनी ज्येष्ठ व्यंगचित्रकार आर.के. लक्ष्मण यांच्यासमवेतही काही काळ काम केले. फ्री प्रेस जर्नलमध्ये काम करीत असतानाच ठाकरे विविध संस्थांसाठी, कंपन्यांसाठी व नियतकालिकांसाठी चित्रे, व्यंगचित्रे, जाहिरातीचे डिझाइन या क्षेत्रांतही काम करीत असत.
शिवसेना पक्ष
बाळासाहेब ठाकरेंनी जून 19 इ.स. 1966 रोजी शिवसेनेची स्थापना केली. ठाकरेंच्या मते, ‘समाजसुधारकांची समृद्ध परंपरा असलेला महाराष्ट्र पुरोगामी आहे, पण मराठी माणूस मागेच राहिला आहे. महाराष्ट्रात सुविधा आहेत, पण मराठी माणूस दुविधेत आहे. महाराष्ट्रात उद्योग आहेत, पण मराठी तरुण बेरोजगार; तर महाराष्ट्रात पैसा आहे पण मराठी माणूस गरीब आहे. महाराष्ट्राला भारतात मान आहे पण मराठी माणूस महाराष्ट्रातच (प्रामुख्याने मुंबईत) अपमानित होतो आहे.’
शिवसेनेचा पहिला मेळावा ऑक्टोबर 30 इ.स. 1966 रोजी शिवतीर्थ मैदानावर संपन्न झाला. ज्यात सुमारे ५ लाख लोकांचा सहभाग होता. या मेळाव्यापासूनच बाळ ठाकरे आणि शिवतीर्थावरील (शिवाजी पार्कवरील) मराठी माणसांची गर्दी यांच्यामध्ये नातेसंबंध प्रस्थापित होण्यास सुरुवात झाली.
सामना वृत्तपत्र
सामना हे शिवसेना या राजकीय पक्षाचे मुखपत्र असून ते मुंबई शहरातून प्रसिद्ध होते. या वृत्तपत्राची सुरुवात दिवंगत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी केली होती. सुरुवातीच्या काळात सामना मधून बाळासाहेबांची फक्त व्यंगचित्रे प्रकाशित होत असत. पण शिवसेनेची स्थापना झाल्यानंतर हे शिवसेनेचे मुखपत्र बनले.
23 जानेवारी, 1989 रोजी मध्यरात्री शिवसेनेचे मुखपत्र ‘सामना’ सुरू झाले. दादर येथील स्वातंत्र्यवीर सावरकर स्मारकात, शिवसेनाप्रमुख श्री. बाळासाहेब ठाकरे यांच्या शुभहस्ते ‘सामना’चे प्रकाशन करण्यात आले होते. ‘सामना’चा पहिला अग्रलेख होता, ‘या असे सामन्याला.’ या अग्रलेखात सामना सुरू करण्यामागची भूमिका स्पष्ट करण्यात आली होती.
राजकीय कार्य
झुणका भाकर केंद्रांची योजना, वृद्धाश्रमांची साखळी, वृद्धांना सवलती, झोपडपट्टीवासीयांना घरे, मुंबई–पुणे द्रुतगती मार्ग, मुंबईतील उड्डाणपूल, बाँबे चे मुंबई नामकरण अशा अनेक योजना-प्रकल्पांची मूळ संकल्पना ही बाळासाहेब ठाकरेंची होती. व्हॅलेंटाईन डे सारख्या पाश्चिमात्य उत्सवांना विरोध, परप्रांतीयांच्या तसेच बांगलादेशींच्या विरोधातील आंदोलने यांमागचा विचारही त्यांचा होता.
17 नोव्हेंबर 2012 रोजी बाळासाहेब ठाकरे यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्या मृत्यूची बातमी कळताच मुंबई ताबडतोब ठप्प झाली होती, दुकाने आणि व्यावसायिक प्रतिष्ठाने बंद पडली होती. संपूर्ण महाराष्ट्र राज्याला हाय अलर्टवर ठेवण्यात आले होते. त्यांच्या पार्थिवावर शिवाजी मैदानात शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले होते.
बाळासाहेब ठाकरे विचार :
जीवनात एकदा निर्णय घेतला की परत माघे फिरू नका, कारण माघे फिरणारे इतिहास रचू शकत नाहीत.
तोंड वाजवून न्याय मिळत नसेल तर तोंडात वाजवून न्याय मिळवा, पण न्याय मिळालाच पाहिजे.
वयाने म्हातारे झालात तरी चालेल पण विचाराने कधी म्हातारे होऊ नका.
जीवनात एकदा निर्णय करा आणि समोर चालत राहा, मग तुम्हाला इतिहास घडविण्यापासुन कोणीही थांबवू शकणार नाही.
तुमच्याकडे आत्मबल असेल तर जगाच्या पाठीवर तुम्ही कुठेही जा तुम्हाला मरण नाही.
एकजुटीने राहा, जाती आणि वाद काढून मराठी माणसांची भक्कम एकजूट उभारा. तरच तुम्ही टिकाल आणि महाराष्ट्रही टिकेल.
नोकऱ्या मागणाऱ्यांपेक्षा नोकऱ्या देणारे होऊ, ही महत्वाकांक्षा बाळगा.