दिग्पाल लांजेकरांचा बहुचर्चित ‘शिवरायांचा छावा’ चित्रपट
‘या’ तारखेला होणार प्रदर्शित, नवीन पोस्टर आले समोर
मुंबई दि.२६ (प्रतिनिधी) - 'शिवरायांचा छावा' या सिनेमाची घोषणा झाल्यापासून हा सिनेमा चर्चेत आहे. लवकरच हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. दिग्पाल लांजेकर दिग्दर्शित या सिनेमाची प्रेक्षकांना उत्सुकता आहे. अशातच आता या सिनेमाचं नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे.'शिवरायांचा छावा' या सिनेमाचं नवं पोस्टर प्रेक्षकांच्या भेटीला आलं आहे. या पोस्टरने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. पोस्टर रिलीज झाल्यामुळे 'शिवरायांचा छावा' या सिनेमात छत्रपती संभाजी महाराज यांची भूमिका कोण साकारणार याची चाहत्यांना उत्सुकता लागली आहे.
दिग्पाल लांजेकरने 'शिवरायांचा छावा' या सिनेमाचं पोस्टर सोशल मीडियावर शेअर केलं आहे . पोस्टरमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या भूमिकेत एका अभिनेत्याची झलक पाहायला मिळत आहे. त्याचं रौद्र रुप सर्वांचं लक्ष वेधून घेत आहे. तसेच त्याच्या मागे एक सिंहदेखील दिसत आहे. पोस्टर शेअर करत त्यांनी लिहिलं आहे,"गर्जतो आमच्या देही..रक्त बिंदू रक्त बिंदू...राजे आले आमचे..आले रौद्र शंभू रौद्र शंभू". या पोस्टवर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका कोण साकारणार?, विशाल निकम, वैभव तत्त्वादी, जय शिवराय, जय शंभूराजे, अशा कमेंट्स चाहत्यांनी केल्या आहेत.
तेजस्वी, धाडसी, शस्त्रशास्त्र पारंगत शंभूराजांची भूमिका रुपेरी पडद्यावर साकारायची चालून आलेली सुवर्णसंधी कोणत्या कलाकाराला मिळणार हे लवकरच समोर येईल. 'शिवरायांचा छावा' नववर्षात म्हणजेच 16 फेब्रुवारी 2024 रोजी प्रेक्षकांच्या भेटीस येणार आहे. छत्रपती संभाजी महाराजांच्या धगधगत्या अजेय पराक्रमाची कथा दिग्पाल लांजेकरांनी लिहिली असून पटकथा-संवाद आणि गाणी देखील त्यांचीच आहेत. गाण्यांना साजेसं संगीत युवा संगीतकार देवदत्त मनीषा बाजी यांनी दिलं आहे. पार्श्वसंगीत अमर मोहिले यांचे आहे.
छत्रपती संभाजी महाराज म्हणजे असामान्य पराक्रमांचे अधिपतीच. इतिहासाच्या पानांवर सुवर्णाक्षरांत कोरलं गेलेलं स्वराज्यरक्षक छत्रपती संभाजी महाराजांचं अवघं आयुष्य एक धगधगतं अग्निकुंड म्हणावं लागेल. मोठ्या पडद्यावर संभाजी महाराजांचा जीवनपट उलगडण्याचं शिवधनुष्य दिग्दर्शक दिग्पाल लांजेकरने उचललं आहे.