अॅनिमल'ची बॉक्स ऑफिसवर कमाल!
१५व्या दिवशीही केली छप्परफाड कमाई
मुंबई दि. १६ (प्रतिनिधी) - बॉलिवूड अभिनेता रणबीर कपूर आणि अभिनेत्री रश्मिका मंदाना यांच्या 'अॅनिमल' या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर चांगलाच धुमाकूळ घालत आहे. दुसऱ्या आठवड्यातही या चित्रपटाचा दबदबा पाहायला मिळत आहे. आता हा चित्रपट तिसऱ्या आठवड्यात धमाकेदार पदार्पण करणार आहे. आठवड्याच्या मधल्या दिवसांत या चित्रपटाची कमाई काहीशी कमी झाली होती. मात्र, आता वीकेंडला हा चित्रपट पुन्हा मोठी झेप घेऊ शकतो, असा अंदाज व्यक्त केला जात आहे. आता या चित्रपटाची १५व्या दिवसाची कमाई समोर आली आहे. १५व्या दिवशी 'अॅनिमल' या चित्रपटाने ७.५० कोटींची कमाई केली आहे.
सॅकनिल्कच्या रिपोर्टनुसार, १५व्या दिवशी 'अॅनिमल' या चित्रपटाने भारतातील सर्व भाषांमध्ये ७.५० कोटी रुपयांचा व्यवसाय केला. पंधराव्या दिवसाचे कलेक्शन पकडून या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर आतापर्यंत एकूण ४८४.३४ कोटी रुपयांची कमाई केली आहे. 'अॅनिमल' हा चित्रपट लवकरच भारतात ५०० कोटींचा टप्पा ओलांडणार आहे. तर, जगभरात या चित्रपटाने ८०० कोटींचा टप्पा गाठला आहे. तब्बल १०० कोटींच्या बजेटमध्ये बनलेला हा चित्रपट अवघ्या २ आठवड्यात ८०० कोटींच्या क्लबमध्ये पोहोचला आहे. मीडिया रिपोर्टनुसार, या चित्रपटाने केवळ १४ दिवसांत जगभरात ७८४.४५ कोटी रुपयांचा व्यवसाय केला आहे.
'अॅनिमल' या चित्रपटामध्ये रणबीर कपूर, बॉबी देओल, तृप्ती डिमरी, रश्मिका मंदाना आणि अनिल कपूर यांच्या महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. एका वडील आणि मुलाच्या नात्याभोवती फिरणाऱ्या या कथानकात अनेक हिंसाचाराची दृश्ये आहेत, ज्यामुळे सध्या वादही निर्माण होत आहेत. इंटिमेट सीन्स आणि वादग्रस्त दृश्यांमुळे चित्रपटावर बरीच टीका देखील होत आहे. मात्र, बॉक्स ऑफिसवर या चित्रपटाने 'गदर २' आणि 'दंगल' सारख्या ऑल टाईम हिट चित्रपटांचे रेकॉर्ड देखील मोडले आहेत.