अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका,
रुग्णालयात करण्यात आलं दाखल
मुंबई दि. १५ (प्रतिनिधी) - अभिनेता श्रेयस तळपदेला काल हृदयविकाराचा झटका आला होता. त्यामुळे त्याला अंधेरीतील बेलव्ह्यू रुग्णालयात दाखल करण्यात आले. हृदयविकाराच्या झटक्यानंतर लगेचच श्रेयसची अँजिओप्लास्टी करण्यात आली आहे. आज श्रेयसची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे.अभिनेता श्रेयस तळपदेला हृदयविकाराचा झटका आल्याने चाहत्यांना मोठा धक्का बसला होता. सगळ्यांना त्याच्या प्रकृतीची चिंता होती. मात्र आता त्याची प्रकृती स्थिर असल्याची माहिती डॉक्टरांनी दिली आहे. श्रेयसवर डॉक्टरांच्या निरीक्षणाखाली उपचार सुरू आहेत.
वेलकम टू द जंगल' या चित्रपटाच्या शूटिंगच्या कामात श्रेयस तळपदे काल व्यस्त होता. या सिनेमाच्या शूटिंगनंतर तो त्याच्या घरीही गेला होता. मात्र घरी गेल्यानंतर त्याची तब्येत खालावली. त्यानंतर त्याच्या पत्नीने त्याला अंधेरीतील बेलव्यू रुग्णालयात दाखल केले. डॉक्टरांनी तातडीने श्रेयसची अँजिओप्लास्टी केली. श्रेयस तळपदेची प्रकृती आता स्थिर आहे. त्याच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याने त्याला आज किंवा उद्या डिस्चार्ज मिळू शकतो. श्रेयसला डिस्चार्ज मिळणार असल्याची बातमी समोर आल्याने त्याच्या चाहत्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
श्रेयस तळपदे 14 डिसेंबर 2023 रोजी 'वेलकम टू द जंगल' या सिनेमाचे शूटिंग करुन घरी आला. शूटिंग करताना तो एकदम व्यवस्थित होता. शूटिंगमधून घरी गेल्यानंतर अस्वस्थ वाटत असल्याचे श्रेयसने आपल्या बायकोला सांगितले. पत्नीने त्याला लगेचच रुग्णालयात नेलं. पण वाटेत त्याला हृदयविकाराचा झटका आला. अँजिओप्लास्टी केल्यामुळे तो आता बरा आहे.