तरुणांना आठवड्यातून 70 तास काम करण्याचा सल्ला -
इन्फोसिस संस्थेचे संस्थापक नारायण मूर्ती
इन्फोसिस या संस्थेचे संस्थापक नारायण मूर्ती यांनी द रिकॉर्ड' या पॉडकास्टमध्ये मोहनदास पै यांच्यासोबत गप्पा मारल्या. या पॉडकास्टमध्ये त्यांनी दिलेल्या सल्ल्याची सध्या सर्वत्र चर्चा होत आहे. भारताला महाशक्ती बनायचं असेल, अर्थव्यवस्थेमध्ये चीनला मागे टाकायचं असेल तर तरुणांना आठवडाभरात किमान 70 तास काम करायला हवं, असं नारायण मूर्ती म्हणाले.
नारायण मूर्तींच्या '70 तास' च्या सल्ल्यानंतर सोशल मीडियावर अभिनेता शाहरुख खानच्या चक दे इंडिया सिनेमातील '70 मिनिट'सोबत तुलना केली जात आहे. त्या सिनेमात भारताच्या महिला हॉकी विश्वचषकाच्या फायनलमध्ये पोहोचल्या होत्या, त्यावेळी शाहरुखने 70 मिनिटे तुमच्याकडे आहेत, जी तुमची आहेत, ती तुमच्याकडून कोणीही हिरावू शकत नाही, जगाला दाखवून द्या असा सल्ला दिला होता. त्यानंतर आता नारायण मूर्तींनी अर्थव्यवस्थेत 'चक दे इंडिया" करायचं असेल तर तरुणांना आठवड्यातून 70 तास काम करावं लागेल, असं सांगितलं.
आपल्याला जर चीन आणि जपान यासारख्या वेगाने प्रगती करणाऱ्या देशांशी स्पर्धा करायची असेल, तर आपल्याला उत्पादकता अर्थात प्रोडक्टिव्हिटी वाढवावी लागेल. सध्या भारताची उत्पादकता कमी आहे. शिवाय आपली सरकारे निर्णय घेण्यासाठी जो वेळ घेतात तो सुद्धा खूप आहे. त्यातच सरकारी बाबूंच्या भ्रष्टाचारावर अंकूश लावणे आवश्यक आहे. हे सर्व पाहता भारतातील तरुणांना आठवड्यातून 70 तास काम करावं लागेल, नारायण मूर्ती म्हणाले, दुसऱ्या महायुद्धानंतर जर्मनी आणि जपान हे उद्ध्वस्त झाले होते. मात्र त्यांच्या देशातील नागरिकांनी विशेषत: तरुणाईने तासन् तास काम केलं आणि जगाला दाखवून दिलं. तसंच भारतातील तरुणाई जी देशाचे मालक आहेत, ते सुद्धा त्याच ताकदीने अर्थव्यवस्थेसाठी काम करतात.
जगात स्वत:ला सिद्ध करायचं असेल तर त्यासाठी एकमेव पर्याय आहे तो म्हणजे स्वत:चं काम. तुमचं कामच आहे जे तुम्हाला ओळख मिळवून देतं. एकदा तुम्हाला कामामुळे ओळख मिळाली तर तुम्हाला आपोआप मान-सन्मान मिळत जाईल आणि सन्मान तुम्हाला शक्तिशाली बनवेल. चीन याचं सर्वात मोठं उदाहरण आहे. त्यामुळेच तरुणांना आवाहन आहे की, पुढील 20 ते 50 वर्षांसाठी दिवसा 12 तास काम करा, त्यामुळे आपला GDP पहिल्या किंवा दुसऱ्या क्रमांकावर पोहोचेल.
दरम्यान, नारायण मूर्तींच्या सल्ल्यानंतर तरुणाईमध्ये मतमतांतरे आहेत. ओलाचे सीईओ भाविश अग्रवाल यांनी नारायण मूर्तींच्या सल्ल्याशी सहमती दर्शवली. आमच्याकडे कमी काम आणि मनोरंजनासाठी वेळ नाही. अन्य देशांनी ज्यासाठी अनेक पिढ्या घालवल्या, ते आपण ठरवलं तर एकाच पीढीत करु शकते, असं अग्रवाल म्हणाले. दुसरीकडे सिनेनिर्माते रोनी स्क्रूवाला यांनी नारायण मूर्ती यांच्या विचारांवर असहमती दर्शवली. स्क्रूवाला म्हणाले, केवळ उत्पादकता वाढवणे हे दीर्घकाळ काम केल्याने सिद्ध होईल असं नाही.