राजकीय नेत्यांकडून पुण्यातील 10000 कोटींहून अधिक अनेक सार्वजनिक जमिनी - मालमत्ता हडप; वर्षानुवर्षे उपभोग घेऊन चाखताहेत मलिदा!
Xtreme News India
26-10-2024 00:28:10
14534065
राजकीय नेत्यांकडून पुण्यातील 10000 कोटींहून अधिक अनेक सार्वजनिक जमिनी - मालमत्ता हडप; वर्षानुवर्षे उपभोग घेऊन चाखताहेत मलिदा!
(संजयकुमार जोशी यांजकडून)
पुणे - सवंग लोकप्रियता मिळवून, सर्वसामान्य नागरिकांना आमिष दाखवून राजकीय पक्षाचे सदस्य होऊन लोकप्रतिनिधीपद म्हणजेच आमदारकी - खासदारकी - नगरसेवक पदावर बसायचं याबाबत पुण्यातील राजकीय पुढारी अत्यंत वाकबगार आहेत. एवढेच नव्हे तर या नेत्यांनी शासकीय, महापालिका, ट्रस्ट, सहकारी संस्था आणि काही ठिकाणी तर अशासकीय खासगी मालकीच्या महत्वाच्या भूखंडावर गेली अनेक वर्षे हक्क मिळवून आपल्या कुटुंबातील सदस्य यांच्या नावावर या मालमत्ता केल्या आहेत. पुण्यातील अशा सुमारे 10000 कोटींहून अधिक मालमत्ता हडप झालेल्या असून त्याचा फायदा गेली अनेक वर्षे ही मंडळी राजरोसपणे घेत आहेत, याची चौकशी करण्यात यावी यासाठी जनजागृती समितीच्या माध्यमातून अशा प्रकारच्या सर्व मालमता आणि या बळकवणाऱ्या लोकप्रतिनिधी यांचे सर्वेक्षण हाती घेण्यात आले आहे. येत्या तीन महिन्यांत हे सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर जे लोकप्रतिनिधी व पुढारी नेते यात सहभागी झाले आहेत अशाच्या विरुद्ध दस्तऐवज पुराव्यानिशी त्या राजकीय पुढाऱ्यांचे संबंधित राजकीय पक्ष, जिल्हाधिकारी आणि न्यायालय यांच्या माध्यमातून ही सर्वच प्रकरणे मार्गी लावण्यासाठी कसोशीने प्रयत्न केले जाणार आहेत अशी खात्रीपूर्वक माहिती मिळाली आहे. आणि त्यामुळे सदरची रक्कम वसूल करण्यासाठी केंद्र सरकारकडे मा.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतंत्र चौकशी समिती स्थापन करावी अशी मागणी करण्यात येणार आहे. शिवाय ही सर्व प्रकरणे अँटी करप्शन तसेच कायदेशीर कारवाई करण्यासाठी दाखल केली जाणार आहे, खात्रीपूर्वक माहिती मिळाली आहे.
पुणे महापालिका प्रशासनाने पुणे शहराच्या मध्यवर्ती भागातील तसेच उपनगरात असलेल्या अनेक भूखंडावर ज्या ठिकाणी अतिक्रमणे झाली आहेत त्यावर अनेकदा कारवाई केली आहे परंतु या मालमत्ता पुढाऱ्यांनी सोडलेल्या नाहीत. अशी अनेक प्रकरणे दिसून आली आहेत. पुण्यातील कसबा पेठ, लक्ष्मी रोड, कर्वे रोड, जंगली महाराज रोड, मॉडेल कॉलनी, येरवडा, मार्केट यार्ड, लुल्ला नगर, कॅन्टोन्मेंट, वानवडी, कात्रज, मुंढवा, केशवनगर, हडपसर, साडेसतरा नळी, मांजरी, फुरसुंगी, उरुळी देवाची, खराडी, वाघोली, लोहगाव, धानोरी, विश्रांतवाडी, उंर्डी, सिंहगड रोड, पाषाण, सुस, बावधन, कोथरूड, आदी ठिकाणी जाऊन प्रत्यक्ष कृती आराखडा तयार करण्यात आलेला आहे, याठिकाणी अनेक भुखंड माफियांनी राजकीय वरदहस्त घेऊन मालमत्ता बळकावल्या आणि वर्षानुवर्षे उपभोग घेत आहेत असे या कृतीसमितीला दिसून आले आहे.
या पार्श्वभूमीवर पुण्यातील एका प्रकरणी प्रथमच डॉ. महमंदखान करीमखान आणि त्यांच्या पत्नी बिबी राबियाबी यांनी १९३५ साली लक्ष्मी रस्त्यावरील १७ हजार ३०० फूट क्षेत्रफळ असलेली सुमारे १०० कोटी रुपयांची मालमत्ता आमदार रवींद्र धंगेकर यांची पत्नी प्रतिभा यांच्यासह अन्य साथीदारांच्या साथीने हडप केल्याचा प्रकार उघड झाला आहे. महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळ, छत्रपती संभाजीनगर यांनी नुकत्याच दिलेल्या निकालात ही मालमत्ता 'वक्फ' बोर्डाची असल्याचे घोषित केल्यानंतर याठिकाणी सुरू असलेल्या बांधकामाला महापालिकेने तातडीने स्थगिती दिली आहे. लक्ष्मी रस्त्यावर हामजेखान चौकात असलेला हा १७ हजार चौरस फुटाच्या भूखंडाची किंमत १०० कोटी रुपयांहून अधिक आहे. याठिकाणी होणारी उलाढाल ही करोडो रुपयांमध्ये असल्याने या भूखंडावर डोळा ठेवून तो लाटण्यात आल्याचा आरोप पत्रकार परिषदेत पुणे महानगर पालिकेच्या स्थायी समितीचे माजी अध्यक्ष गणेश बीडकर यांनी केला आहे.
या जमिनीचा सध्याचा ताबा हा आमदार धंगेकर यांची पत्नी प्रतिभा यांच्यासह सहकारी व्यक्तींकडे आहे. गेली अनेक वर्षे याप्रकरणी सुरू असलेल्या न्यायालयीन संघर्षानंतर ७ ऑक्टोबर रोजी वक्फ मंडळाने हा भूखंड वक्फ असल्याचे घोषित केले. त्यामुळे मुस्लिम समाजाला एक मोठा दिलासा मिळाला आहे. त्यासाठी चित्तारी यांनी अनेक वर्ष न्यायालयीन लढा दिला. ही जागा वक्फ असल्याचे धंगेकर यांना माहिती असतानाही त्यांनी या जागेचा वापर स्वतःच्या फायद्यासाठी सुरू ठेवला होता. त्याला वक्फ मंडळाच्या आदेशाने लगाम लागला आहे. आमदार धंगेकर हे अनेक वर्ष महापालिकेत नगरसेवक होते. त्यांच्या पत्नीच्या नावे हा भूखंड असल्याने त्यांनी आपल्या पदाचा गैरवापर करत वक्फ असलेली मालमत्ता स्वतःच्या फायद्यासाठी लाटून त्याठिकाणी मोठ्या प्रमाणात बांधकाम सुरू केले असल्याचा आरोप मूळ अर्जदार व सहकारी यांनी पत्रकार परिषदेत केला.
पुण्यातील डॉ. महमंदखान करीमखान यांनी ही मालमत्ता वक्फला देताना या मालमत्तेचा कशासाठी वापर करण्यात यावा, हे आपल्या वक्फनाम्यात स्पष्ट केले होते. या मालमत्तेपासून मिळणारे उत्पन्न मशिदीसाठी, गरजवंत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती, दफनविधी, गरिबांचे लग्नकार्य आदी समाजउपयोगी कार्यासाठी खर्च करावे, असा उदार विचार डॉ. महमंदखान करीमखान यांनी १९३६ साली वक्फनाम्यात मांडला होता. मात्र, त्यांच्या पश्चात ही जमीन वक्फ न होता तिचा गैरवापर सुरू होता. या प्रकरणी रसुल अन्सर चित्तारी आणि त्यांचे सहकारी डॉ. एहेतेशाम शेख, वसीमभाई शेख, महिबूब सय्यद, वाहिद शेख, साबीर सय्यद, जमीर मोमीन, हमजा एहेतेशाम शेख, फारुख शेख, शफी मामु यांनी वक्फ मंडळाकडे पाठपुरावा सुरू केल्यानंतर हा गैरप्रकार लक्षात आला आहे.
महापालिका प्रशासनाने या बांधकामास परवानगी दिल्याने वक्फ मंडळाने महापालिका आयुक्तांनाही पत्र पाठवून हे बांधकाम थांबविण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार महापालिकेच्या बांधकाम विभागाने तातडीने या बांधकाम थांबविण्याचे आदेश मे. उत्कर्ष असोसिएटसतर्फे प्रतिक सुनील आहिर व इतरांना १८ ऑक्टोबर रोजी दिले आहेत. याशिवाय वक्फ मंडळाने जिल्हाधिकारी तसेच संबंधित यंत्रणांना आदेश देत या मालमत्ता पत्रकाच्या मालकी हक्कात वक्फ संस्थेचे (डॉ. महमंदखान करीमखान बीबी राबिया वक्फ) यांचे नाव लावण्यात यावे, तसेच या मालमत्ता पत्रकात असलेल्या खासगी व्यक्तींची नावे कमी करावीत, असे आदेश दिल्याने खळबळ उडाली आहे.
एका लोकप्रतिनिधींकडून सार्वजनिक वापरासाठी, गोरगरिबांसाठी दान केलेल्या (वक्फ) जागेचा स्वतःच्या हितासाठी तिचा वापर करणे हे दुर्दैवी आहे. याप्रकरणी वक्फ मंडळाकडे आमदार रविंद्र धंगेकर यांच्या पत्नी प्रतिभा रविंद्र धंगेकर व त्यांचे सहकारी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा आणि लवकरात लवकर ताबा घेण्यात यावा. तसेच जिल्हा भूमिअभिलेख / नगर भुमापन क्र. २ येथे अर्ज करून प्रॉपर्टीकार्डवरून नाव कमी करून वक्फ बोर्डाचे नाव त्वरित करण्यात यावी असा अर्ज वक्फ बोर्डकडे करण्यात आला आहे, असे बीडकर यांनी म्हटलं आहे.
दरम्यान, पुण्यातील ज्या ज्या शासकीय - अशासकीय, महापालिका, ट्रस्ट, तसेच इतर कायदेशीर कचाट्यात अडकलेल्या न्यायालयीन प्रकरणातील (लेटिगेशन प्रापर्टीज) आदी भूखंडावर ताबा असणाऱ्या या मालमत्तामधून गेली वर्षोनुवर्षे अनेकांनी व्यावसायिक - व्यापारी वापर केला आहे, अनेकांनी या भूखंडावर इमारती बांधल्या आहेत. सदनिका विकल्या आहेत आणि सर्वसामान्य नागरिकांची मोठी फसवणूक केली आहे. याशिवाय अनेकांनी व्यापारी (कमर्शियल बिल्डिंग) इमारती उभ्या करुन सहकारी संस्था, बँका, मल्टिनॅशनल कंपन्या यांना व्यावसायिक दराने भाड्याने दिल्या आहेत. अनेकांनी पे अँड पार्क म्हणून या भूखंडावर अतिक्रमण केली आहेत अशी प्राथमिक माहिती या सर्वेक्षण समितीच्या माध्यमातून पुढे आली आहे असे या समितीच्या बैठकीत सांगण्यात आले आहे. असा मलिदा खाणाऱ्या लोकप्रतिनिधी पुढारी नेत्यांनी सार्वजनिक फसवणूक केली आहे .
(छायाचित्रे - प्रातिनिधिक)
Contact For News & Advertisement.