Editor: Mr. Shrikrishna Aayacit, Executive Editor: Mr. Sanjaykumar Joshi
 Top Advertisement's

 Pune City

वारकऱ्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि मूलभूत सुविधांसाठी पुणे जिल्हा प्रशासनाची सर्वंकष तयारी

Xtreme News India   02-07-2026 13:03:15   19873484

वारकऱ्यांच्या आरोग्य, सुरक्षितता आणि मूलभूत सुविधांसाठी पुणे जिल्हा प्रशासनाची सर्वंकष तयारी

 

पुणे, दि. 2 (जिमाका, वृत्त सेवा) :आषाढी वारीसाठी श्री क्षेत्र देहू येथून जगद्गुरु श्री संत तुकाराम महाराज व श्री क्षेत्र आळंदी येथून संतश्रेष्ठ श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालख्यांचे प्रस्थान करणाऱ्या लाखो वारकऱ्यांना सुरक्षित, स्वच्छ आणि गुणवत्तापूर्ण आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी पुणे जिल्हा प्रशासनाने व्यापक नियोजन पूर्ण केले असून, त्याची प्रत्यक्ष पडताळणी करण्यासाठी पुणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील यांच्या नेतृत्वाखाली देहू–आळंदी पालखी मार्गाची उच्चस्तरीय पाहणी करण्यात आली.

 

या पाहणी दौऱ्यात अति. मुख्य कार्यकारी अधिकारी चंद्रकांत वाघमारे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) भूषण जोशी, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (कृषी, पाणीपुरवठा व स्वच्छता) पाथरवटकर, देहू व आळंदी नगरपरिषदांचे मुख्याधिकारी, जिल्हा परिषद स्तरावरील सर्व स्थानिक पदाधिकाऱ्यांसह हवेली व खेड पंचायत समितीचे सभापती तसेच विविध स्तरावरील पदाधिकारी,दोन्हीही गट विकास अधिकारी, हवेली पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुरेश गोरे, खेड पंचायत समितीचे तालुका आरोग्य अधिकारी डॉ. विलास माने, विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

यावेळी पालखी मार्गावरील विहिरी, बोअरवेल, टँकर भरणा केंद्रे आणि पिण्याच्या पाण्याच्या स्रोतांची स्वच्छता व नियमित क्लोरीनेशन. हॉटेल, भोजनालये आणि अन्नविक्री केंद्रांमधील स्वच्छता, सुरक्षित अन्न हाताळणी आणि अन्नपदार्थ झाकून ठेवण्याच्या उपाययोजना. पालखी मार्गावरील परिसर स्वच्छता, धूर फवारणी, डास नियंत्रण व संसर्गजन्य आजार प्रतिबंधक उपाय. वारकऱ्यांसाठी उभारण्यात येणारी तात्पुरती मोफत आरोग्य केंद्रे, आयसीयू सुविधा, जर्मन हँगर, चरणसेवा केंद्रे आणि वैद्यकीय पथके. १०८ आणि १०२ आपत्कालीन रुग्णवाहिका सेवा तसेच एएलएस व बीएलएस रुग्णवाहिकांची उपलब्धता व तत्परता. पालखी मुक्कामस्थळी औषधसाठा, प्रशिक्षित आरोग्य कर्मचारी, आपत्कालीन उपचार व्यवस्था आणि संदर्भ सेवा. सार्वजनिक व तात्पुरत्या शौचालयांची स्वच्छता, पिण्याच्या पाण्याची उपलब्धता आणि कचरा व्यवस्थापन. नैसर्गिक आपत्ती किंवा आपत्कालीन परिस्थिती हाताळण्यासाठी नियंत्रण कक्ष, समन्वय यंत्रणा आणि विभागनिहाय कृती आराखड्याची तयारी. पालखी मार्गावरील खड्डेमुक्त रस्ते, स्वच्छ परिसर आणि वारकऱ्यांच्या सोयीसाठी करण्यात आलेल्या नागरी सुविधांची पाहणी.

 

मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील म्हणाले, "आषाढी वारी ही महाराष्ट्राच्या सांस्कृतिक आणि आध्यात्मिक परंपरेचे प्रतीक आहे. लाखो वारकऱ्यांच्या आरोग्याचे संरक्षण आणि त्यांच्या सुरक्षिततेची जबाबदारी प्रशासनाची आहे. त्यामुळे आरोग्य, स्वच्छता, सुरक्षित पिण्याचे पाणी, आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणि आवश्यक सर्व सुविधा कोणत्याही प्रकारची त्रुटी न राहता उपलब्ध करून देण्यासाठी प्रत्येक विभागाने समन्वयाने कार्य करावे. वारकऱ्यांची वारी सुरक्षित, निरोगी आणि सुखकर व्हावी, यासाठी पुणे जिल्हा प्रशासन पूर्ण क्षमतेने सज्ज आहे." 

 

पाहणीदरम्यान संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचना देण्यात आल्या. सर्व विभागांनी समन्वयाने कार्य करून प्रत्येक सेवा वेळेत, गुणवत्तापूर्ण आणि परिणामकारक पद्धतीने उपलब्ध करून देण्याचे निर्देशही मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी दिले.

 

 वारकऱ्यांची सेवा हीच विठ्ठल सेवा मानून पुणे जिल्हा प्रशासन आषाढी वारीसाठी संपूर्ण तयारीनिशी सज्ज असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला .


Contact For News & Advertisement.


 Your Feedback



 Advertisement