‘सांस्कृतिक मार्क्सवाद भारतातच गाडला जाणार’ – अभिजीत जोग
Xtreme News India
03-02-2024 20:42:05
1348397
सांस्कृतिक मार्क्सवादाचे सध्या भारत हे लक्ष्य ; हिंदुत्वाला संपूर्ण जगातून उखडून टाकण्यासाठी अभियान राबविले !
‘सांस्कृतिक मार्क्सवाद भारतातच गाडला जाणार’ – अभिजीत जोग
स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान व्याख्यानमालेचे दुसरे पुष्प
पुणे (प्रतिनिधी) - सर्व धर्मसंस्थांची टिंगल करणे हेही सांस्कृतिक मार्क्सवादाचे एक प्रमुख लक्षण आहे. देशाचा विकृत इतिहास मांडणे आणि देशप्रेमाची भावना नष्ट करणे यासाठी प्राध्यापकांच्या पिढ्या घडविल्या गेल्या आहेत. अशा सांस्कृतिक मार्क्सवादाचे सध्या भारत हे लक्ष्य आहे. आय. आय. टी. हा ब्राह्मणवाद अशी मांडणी, जगातल्या गुलामगिरीचे मूळ भारतातल्या जातिवादात आहे असे प्रतिपादन अनेक विचारवंत जागतिक व्यासपीठावर करत असतात. हिंदुत्वाला संपूर्ण जगातून उखडून टाकण्यासाठी या लोकांनी अभियान राबविले आहे. असे प्रतिपादन लेखक व विचारवंत श्री अभिजीत जोग यांनी ‘जगाला पोखरणारी वैचारिक वाळवी’ यांनी केले.
यावेळी ते म्हणाले की, वैविध्याचा अनाठायी आग्रह धरत भारतीयांना बाहेर नोकरी मिळु नये यासाठी उद्योगक्षेत्रावर दबाव आणला जात आहे, अमेरिकेसारख्या देशातील मोठ्या कंपनीत दलितावर अन्याय झाल्याची बोंब मारली जाते आणि दबाव उत्पन्न केला जातो. अशा सर्व चळवळींचे मुखवटे मानवतेचे असल्याने यांना एकदम विरोध करणे अवघड वाटते. मात्र आपण सावध राहणे गरजेचे आहे. भारताला लक्ष्य करण्यामागे डाव्यांचे एकच आकलन आहे, ते म्हणजे इथली संस्कृती ही इथली ताकद आहे, हे त्यांनी ओळखले आहे. त्यामुळे सांस्कृतिक मार्क्सवादाशी अंतिम लढाई भारतातच होणार आणि यात भारतीय संस्कृती जिंकणार हे निश्चित आहे, पण तरीही सावधानी आवश्यक आहेच.”
स्वानंद जनकल्याण प्रतिष्ठान आयोजित स्वातंत्र्यवीर सावरकर स्मृती व्याख्यानमालीच्या दुसऱ्या पुष्पाची सांगता आज झाली. या दुसऱ्या दिवशी सुप्रसिद्ध लेखक श्री अभिजीत जोग यांनी ‘जगाला पोखरणारी वैचारिक वाळवी’ या विषयावर श्रोत्यांचे उद्बोधन केले. यावेळी व्यासपीठावर स्वानंदचे विश्वस्त श्री सचिन नागपुरे, आनंदक्षण शाळेचे संचालक आणि भाजपा ओबीसी मोर्चा चे अध्यक्ष श्री अतुल चाकणकर, स्वानंदचे संस्थापक सदस्य श्री सतीश कालगावकर हे मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाच्या प्रारंभी कु. तनया जोशी हिने गायिलेल्या प्रार्थनेनंतर श्री सचिन नागपुरे यांनी प्रास्ताविक केले. स्वानंदमार्फत चालविल्या जाणाऱ्या समृद्धी वर्ग आणि किशोर दर्पण वर्ग या दोन उपक्रमांवर श्री नागपुरे यांनी प्रकाश टाकला. यानंतर आंबेडकर नगर वस्ती मधील समृद्धी वर्गाच्या विद्यार्थ्यांनी समूहगीत प्रस्तुत केले. प्रमुख अतिथींच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या शिक्षकांचा गौरव केला गेला.
व्याख्याते श्री अभिजीत जोग यांनी मांडलेला विषय सर्व श्रोत्यांना अंतर्मुख करून गेला. जगातील सर्व प्राचीन संस्कृतींना आणि विचारधारांना डावी विचारसरणी वाळवीप्रमाणे पोखरण्याचे काम करीत असल्याचे श्री. जोग यांनी सप्रमाण दाखवून दिले. या महत्वाच्या विषयाचे विश्लेषण श्री. अभिजीत जोग यांनी पुढीलप्रमाणे केले -
“खरे तर सर्वांनाच आपापल्या संस्कृतीचा अभिमान असतो. पण डावी विचारसरणी ही अशी विचारसरणी आहे जिला प्रस्थापित सर्व संस्कृतींचा विध्वंस करायचा आहे. देव-असूर अशा संकल्पना सुष्ट-दुष्ट या अर्थी आपल्याकडे आणि इतरत्रही आहेत. मात्र डावे विचारवंत स्वतःला असूरवादी किंवा सैतानवादी म्हणवतात. रशियन लेखक बाकूनीन याने ‘लोकांमधील नीच प्रवृत्ति आपल्याला जाग्या करायच्या आहे’ असे जाहीरपणे सांगितले. कार्ल मार्क्सचे वर्णन मानवतावादी असे केले जाते मात्र तो टोकाचा वंशवादी होता, हे वास्तव आहे. जगातील प्रतिगामी वंश हे नाहीसे होणार आहेत किंवा ज्यू हे एखाद्या रोगाप्रमाणे आहेत, असे विचार मार्क्सनेच मांडले आहेत. सातत्याने संघर्ष, अराजकता, हिंसेचं अति आकर्षण, कमालीची नकारात्मकता ही मार्क्सवादाची ठळक वैशिष्ट्ये आहेत. ‘आपण मुलांना द्वेष करण्यास शिकवलं पाहिजे’ ही लेनिनची शिकवण होती तर ‘आधी विश्वास उत्पन्न करुन नंतर विश्वासघात करणे’ यासारखी चांगली गोष्ट दुसरी काही नाही’ असे स्टॅलिन म्हणत असे. माओने वयाच्या आठव्या वर्षापासून चीनी तत्ववेत्ता कन्फ्युशियस याचा द्वेष केला. सिनिसिजम (पापांचे उदात्तीकरण), सॅडिजम (कायम वाईट गोष्टींवर लक्ष देणे), अराजकतावाद, यांच्या जगभर असलेल्या प्रभावाचे मूळ डाव्या विचारसरणीतच आहे.
वर्गसंघर्ष पेटत रहायला हवा आणि अराजक माजायला हवे हीच मार्क्सची शिकवण होती. इंग्लंड आणि जर्मनीत प्रथम क्रांति होईल असा मार्क्सचा आडाखा होता. पण तसे झाले नाही. उलट तिथे राष्ट्रवादच फोफावला. डाव्यांनी मध्यमवर्गाचा कायम द्वेष केला, कारण संस्कृती जपण्याचे खरे काम हा वर्ग करतो. त्यामुळे कामगारांनी मध्यमवर्गीय बनणे डाव्यांना अस्वीकार असते.
‘बंदुकीच्या नळीतून क्रांति न करता वैचारिक वाळवीची उपज करण्याची योजना डाव्या विचारकांनी १९२० मध्येच केली होती. नीट अभ्यास केला असता ही योजना खूप अंशी – विशेषत: पाश्चात्य देशांत - यशस्वी ठरल्याचे दिसून येते. हाच आहे सांस्कृतिक मार्क्सवाद किंवा वोकिजम. याद्वारे कुटुंब, धर्म, देशप्रेम, शिक्षण, लोकशाही अशा संस्थांवर सातत्याने हल्ला केला गेला. दैनंदिन व्यवहारातील सर्व गोष्टींकडे शोषक-शोषित याच चष्म्यातून पाहण्याची सवय लोकांना जाणीवपूर्वक लावली गेली. वेगवेगळ्या देशांतील समाजात वेगवेगळी विभाजने – जसे काळे विरुद्ध गोरे, उच्चवर्णीय विरुद्ध दलित आणि आदिवासी, स्त्री विरुद्ध पुरुष, मुले विरुद्ध पालक – केली गेली.
कुठल्याही यशाचे विश्लेषण ‘ते विशेष अधिकारांमुळेच मिळते’ आणि म्हणून ज्यांना हे मिळत नाही त्यांना ते सरकारने द्यायला हवे (आणि त्यासाठी संघर्ष पेटत राहायला हवा) अशी मांडणी रुजवली गेली. या विचित्र मांडणीमुळे लढण्यातली जिद्द संपून जाते. शिवाय याविरुद्ध कोणी बोलले तर त्याला आयुष्यातून उठवले जाण्याची यंत्रणाही सज्ज असते.
कुटुंब व्यवस्था ही तर डाव्यांची शत्रूच आहे. ती उद्ध्वस्त करण्यासाठी अतिरेकी व्यक्तिवादाचे शस्त्र वापरले जाते. या बाबतीत भांडवलशाही आणि डावे यांचे एकमत आहे, कारण ही मांडणी भांडवलदारांना लाभदायी ठरली. अर्थात यातील सामाजिक आणि सांस्कृतिक धोके अलीकडे लक्षात येत आहेत.
स्त्रीवादामध्ये ‘स्त्री आणि पुरुष एकमेकांचे शत्रु आहेत’ असे विकृत चित्र हेतुत: उभे केले गेले. अमेरिकेत १९६९ साली केट मिलेट या कम्युनिस्ट महिलेने पुरुष विरोधी चळवळ उभी केली. या चळवळीत कुटुंब व्यवस्था उद्ध्वस्त करण्याची आणि त्यासाठी लैंगिक स्वैराचार पसरविण्याची शपथ सहकारी महिलांना दिली गेली. आज अमेरिकेत याचा अतिरेक झाला आहे.
ट्रान्सजेंडरिजम हे वोकीजमचे एक भयानक अपत्य आहे. लिंग हे समाजाने लादलेले असते अशी ही विकृत मांडणी आहे. आपला लिंगबदल करण्याचे स्वातंत्र्य १० वर्षाच्या मुलांनाही अमेरिकेत उपलब्ध असून त्याला कायद्याचे संरक्षणही प्राप्त आहे. आपण स्त्री आहोत की पुरुष हे दर दिवशी ठरविण्याची विकृती यातूनच उपजली आहे. एका बलात्कारी गुंडाने आपण स्त्री असल्याचे सांगत स्त्री कैद्यांच्या कक्षात राहण्यासाठी केलेला संघर्ष मध्ये गाजला होता, तोही यातलाच प्रकार आहे. ‘क्वियर राइट्स’ या नावाखाली ‘एखाद्या व्यक्तीला तो एखादा प्राणी असल्याचे वाटणे’ असलेही प्रकार आता सुरू झाले असून असल्या गोष्टींनाही आता कायदेशीर संरक्षण मिळू लागले आहे. असेही ते म्हणाले.
या अभ्यासपूर्ण व्याख्यानास श्रोत्यांनी भरभरून प्रतिसाद दिला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मानसी ठाकूर यांनी केले तर तूहीन जोशी याने गायिलेल्या पसायदानाने दुसऱ्या दिवशीच्या व्याख्यानाची सांगता झाली.
Contact For News & Advertisement.