मुंबईकरांनो, रविवारी लोकलने प्रवास करणार असाल तर आधी मेगाब्लॉकची ही बातमी वाचा
सोमवारी 22 जानेवारीलाही महाराष्ट्र सरकारने सुट्टी जाहीर केल्यामुळे मुंबईकर तुम्ही रविवारी घराबाहेर पडणार असाल तर लोकलचं वेळापत्रक जाणून घ्या.
मुंबई (प्रतिनिधी) - येत्या सोमवारी 22 जानेवारीला अयोध्येत रामलल्लाची प्राणप्रतिष्ठापणा होणार आहे. त्यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवार 22 जानेवारीला सुट्टी जाहिर केली आहे. त्यामुळे जर तुम्ही लॉंग विकेंड म्हणून शनिवार, रविवार घराबाहेर पडणार असाल तर रविवारचं लोकलचं वेळापत्रक जाणून घ्या अन्यथा तुमचे नाहक हाल होतील. रविवारी 21 जानेवारीला मध्य रेल्वे आणि हार्बर मार्गांवर मेगाब्लॉक असणार आहे. त्यामुळे त्यानुसार तुमचं रविवारचा प्लॅन करा.
रेल्वेकडून अभियांत्रिकी आणि देखभाल दुरुस्तीच्या कामांसाठी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येत असतो. त्यामुळे प्रवाशांनी गैरसोय टाळण्यासाठी रविवारचं लोकलचं वेळापत्रक पाहू बाहेर पडण्याची विनंती रेल्वे प्रशासनाकडून करण्यात आली आहे.
मध्य रेल्वेवर मेगाब्लाक किती वाजता आणि कुठल्या मार्गावर?
मध्ये रेल्वेवरील मुलुंड ते माटुंगा अप जलद मार्गावर 21 जानेवारी रविवारी मेगाब्लॉक घेण्यात येणार आहे. सकाळी 10.50 ते दुपारी 3.46 पर्यंत ठाणे येथून सुटणाऱ्या अप जलद मार्गावरील सेवा मुलुंड आणि माटुंगा स्थानकांदरम्यान अप धीम्या मार्गावर वळविण्यात येणार आहे.
हार्बरवर मेगाब्लाक किती वाजता आणि कुठल्या मार्गावर?
कुर्ला-वाशी अप आणि डाउन हार्बर मार्गावर सकाळी 11.10 ते दुपारी 4.10 वाजेपर्यंत मेगाब्लॉक असणार आहे. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईहून सकाळी 10.34 ते दुपारी 3.36 वाजेपर्यंत वाशी/बेलापूर/पनवेलसाठी सुटणाऱ्या डाऊन हार्बर मार्गावरील सेवा बंद असणार आहे. त्याशिवाय पनवेल/बेलापूर/वाशीहून 10.16 ते दुपारी 3.47 वाजेपर्यंत छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबईसाठी सुटणाऱ्या अप हार्बर मार्गावरील सेवा रद्द असणार आहेत.
तर छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई ते कुर्ला आणि पनवेल आणि वाशी दरम्यान मेगाब्लॉक काळात विशेष लोकल धावणार आहेत. त्याशिवाय हार्बर मार्गावरील प्रवाशांना मेगाब्लॉक काळात 10 ते संध्याकाळी 6 वाजेपर्यंत ठाणे-वाशी/नेरूळ स्थानकावरून प्रवास करण्याची मुभा देण्यात आली आहे.