Xtreme News India 19-01-2024 17:33:00 78823
रे नगर हा देशातील आदर्श प्रकल्प ठरेल - नरेंद्र मोदी पंतप्रधानपदाची हॅटट्रिक करण्याची गॅरंटी : तिसऱ्या टर्ममध्ये भारताची अर्थव्यवस्था जगातील टॉप तीनमधील असणार : पंतप्रधान मोदी सोलापूर (प्रतिनिधी) - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रे नगर प्रकल्प हा देशातील आदर्श प्रकल्प ठरेल असा विश्वास व्यक्त करत आगामी लोकसभा निवडणुकीत देशात पुन्हा भाजपचेच सरकार येईल अन् पंतप्रधान म्हणून आपण तिसरी टर्म पूर्ण करणार असल्याची गॅरंटी लाखों श्रमिकाच्या साक्षीने दिली. तिसरी टर्म पूर्ण करताना भारत देश जगातील टॉप तीनच्या अर्थव्यवस्थेमध्ये सहभागी होईल,असा आत्मविश्वासही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केला . दक्षिण सोलापूर तालुक्यातील रे नगर या ठिकाणी माजी आमदार नरसय्या आडम मास्तर यांच्या संकल्पनेतून देशातील सर्वात मोठ्या ३० हजार पैकी १५ हजार असंघटित कामगार वसाहतीचे लोकार्पण आणि पाच लाभार्थ्यांना चावी प्रदान करण्याचा कार्यक्रम शुक्रवारी दुपारी रे नगरातील कार्यस्थळावर पार पडला. यावेळी पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते रिमोट कंट्रोलद्वारे गृहप्रकल्पाचे लोकार्पण करण्यात आले. तसेच सुनिता जगले, लता दासरी ,रिजवाना मकानदार ,बाळूबाई वाघमोडे, आणि लता आडम या पाच लाभार्थ्यांना पंतप्रधानांनी घरांची चावी प्रदान केली. तसेच काही लाभार्थ्यांना कर्जाचे धनादेश दिले. दरम्यान पंतप्रधान मोदींनी आगामी काळात आपणच सत्तेत येणार असल्याचे भाष्य करत भाजपा गरिबांच्या कल्याणासाठी कटीबद्ध असल्याचे सांगितले. देशाला विकसित राष्ट्र करण्यासाठी आत्मनिर्भर भारत बनवणे गरजेचे असल्याचे मतही त्यांनी व्यक्त केले. परिस्थिती नसल्यामुळे अनेकांना हक्काचे घर घेता येत नाही अशा गरजूंसाठी भाजप सरकारने देशभरात सुमारे चार कोटी घरांचे वाटप केले आहे आणि पुढील पाच वर्षे हे काम असेच सुरू राहणार असल्याचे सांगत माझे सरकार गरिबांसाठी समर्पित सरकार आहे. गरिबांचे स्वप्ने पूर्ण करणे हाच माझा संकल्प आहे. दहा वर्षापूर्वी देशात सर्वत्र फक्त झोपड्या दिसत होत्या. मात्र आता आम्ही झोपड्या ऐवजी पक्की घरे देत आहोत. शहरात आज कॉलनी उभ्या केल्या जात आहेत. कामगारांना भाड्याने घरे उपलब्ध करून दिले जात आहे. आज एक लाखाहून अधिक कुटुंबांचा गृहप्रवेश होत आहे त्यामुळे आपणास खूप आनंद होत असून या गरीब लोकांचे आशीर्वाद ही माझी सर्वात मोठी ठेव असल्याचे त्यांनी सांगितले यापूर्वी गरीबी हटावचे नारे दिले जायचे. मात्र गरीबी कधी हटली नाही,असे सांगत काँग्रेस पक्षाचे नाव न घेता मोदींनी त्यांना खोचक टोला लगावला. अर्धी भाकर का खायची आणि घोषणा द्यायचा ही वेळ आता मोदी सरकारच्या काळात येणार नसल्याचे सांगून त्यांनी आपल्या भाषणातून काँग्रेसवर निशाणा साधला.