पुणे ग्रामीण पोलिसांच्या ‘वारसा स्वच्छतेचा, मावळा शिवरायांचा’ या अभियानाच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा
पुणे ग्रामीण पोलिसांनी ‘वारसा स्वच्छतेचा मावळा शिवरायांचा’ हे स्वच्छता ( Lonavala) अभियान सुरु केले आहे.
पुणे (प्रतिनिधी) - एप्रिल 2023 मध्ये या अभियानाचे पहिले पर्व पार पडले. आता या अभियानाच्या दुसऱ्या पर्वाची घोषणा करण्यात आली आहे. दुसऱ्या पर्वात लोणावळा येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक आणि नांगरगाव लोणावळा येथील सोमनाथ महादेव मंदिर इंद्रायणी नदी पात्र येथे हे स्वच्छता अभियान राबवले जाणार असल्याची माहिती सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांनी दिली.
पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक अंकित गोयल, अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांच्या मार्गदर्शनाखाली उपविभागीय पोलीस अधिकारी, सहायक पोलीस अधीक्षक यांच्या संकल्पनेतून ‘वारसा स्वच्छतेचा मावळा शिवरायांचा’ हे गड किल्ले स्वच्छता अभियान एप्रिल 2023 पासून सुरु करण्यात आले आहे.
26 एप्रिल 2023 रोजी मावळ तालुक्यातील कार्ला येथील ऐतिहासिक एकविरा गड व बौद्ध कालीन लेण्यांची स्वछता करून या अभियानाची सुरुवात करण्यात आली. या अभियानात पोलीस अधिकारी, अंमलदार यांच्यासह महाविद्यालयीन विद्यार्थी, एनसीसी कॅडेड, सेवाभावी संस्थांचे पदाधिकारी, ग्रामस्थ, वकील, पत्रकार, पोलीस पाटील व नागरिकांनी सहभाग घेतला. या अभियानास नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.