कुणी कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला तर त्याचा मुलाहिजा ठेवला जाणार नाही - अजित पवार
कल्याण (प्रतिनिधी) - कुणी कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला तर त्याचा मुलाहिजा ठेवला जाणार नाही, असा इशाराच मनोज जरांगे यांचे नाव न घेता अजित पवारांनी दिला आहे. मात्र, तू पाप धुण्यासाठी इकडे आलाय. तुझ्या गावात मराठे तुझा सुफडा साफ करतील. तू इथून पुढे बोलला तर उद्यापासून तुला सोडणार नाही, असा उलटवार इशाराच जरांगे पाटील यांनी अजित पवार यांना दिला आहे.
दरम्यान, काहीही झालं तरी येत्या 20 जानेवारी रोजी आम्ही मुंबईत येणारच. मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्यासाठी आम्ही येणारच आहोत, असा निर्धार मनोज जरांगे पाटील यांनी व्यक्त केला आहे. तर, कुणीही कायदा हातात घेतला तर त्याचा मुलाहिजा ठेवणार नाही, अशा कडक शब्दात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मनोज जरांगे यांना इशारा दिला आहे. अजितदादांचा हा इशारा येताच मनोज जरांगे यांनीही पलटवार करत जशास तसे उत्तर दिलं आहे. त्यामुळे अजितदादा आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात येत्या काही काळात चांगलीच जुंपण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
आज कल्याणमध्ये कार्यकर्ता मेळाव्याला संबोधित करताना अजित पवार यांनी थेट मनोज जरांगे पाटील यांना नाव न घेता कडक इशारा दिला आहे. काही लोक सध्या टोकाचं बोलत आहेत. देशासमोर राज्यासमोर काय प्रश्न आहे हे लक्षात न घेता सध्या वाचाळवीरांची संख्या वाढली आहे. मुद्दयावर बोलणं सोडून इतर विषयावर बोलत आहेत. मुंबईत येण्याची भाषा करत आहेत. भारत रत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्याला संविधान दिलं आहे. या संविधानाला 75 वर्ष झाली आहेत. आजही आपण आपल्या संविधानाचा आदर करत आहोत. घटनेच्या आदेशाने आपण पुढे जात आहोत. पण कुणी कायदा हातात घ्यायचा प्रयत्न केला तर त्याचा मुलाहिजा ठेवला जाणार नाही, असा इशाराच अजितदादांनी दिला आहे.
मनोज जरांगे पाटील यांनीही अजित पवार यांना जशास तसं प्रत्युत्तर दिलं आहे. माझ्या दौऱ्याला चांगला प्रतिसाद मिळतोय. आम्ही आरक्षण घेऊनच परत येऊ. अजित पवार यांना सापडलेल्या नोंदी माहीत नाहीत का? राज्यभरात 54 लाख नोंदी सापडलेल्या असताना संविधानाच्या चौकटीतच आरक्षण मिळेल असे असताना ते विरोधात का बोलत आहात?, असा सवाल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे. आणि तू पाप धुण्यासाठी इकडे आलाय. तुझ्या गावात मराठे तुझा सुफडा साफ करतील. तू इथून पुढे बोलला तर उद्यापासून तुला सोडणार नाही, असा इशाराच जरांगे पाटील यांनी अजित पवार यांना दिला आहे.