साई दर्शनासाठी निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला!
करमाळ्यात कंटेनर जीपच्या अपघातात ४ ठार
सोलापूर दि. २७ (प्रतिनिधी) - कर्नाटकातील गुलबर्गा येथील भाविक सालसेकडून तवेरा गाडीने शिर्डी येथे साई बाबांच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भविकांवर काळाने घाला घातला आहे. करमाळा येथे फिसरे रस्त्यावर कंटेनर आणि तवेराची समोरासमोर धडक झाल्याने हा भीषण अपघात झाला असून यात गाडीतील चार जण जागीच ठार झाले तर चार जण जखमी झाले आहेत. हा अपघात आज सकाळी पहाटेच्या सुमारास झाला.
या अपघातात श्रीशैल चंदेशा कुंभार (वय ५६, गुलबर्गा), शशिकला श्रीशैल कुंभार (वय ५०, गुलबर्गा) आणि ज्योती दिपक हुवशालमठ (वय ३८, बागलकोट) यांचा जागीच मृत्यू झाला तर शारदा दिपक हिरेमठ (वय ७०, हुबळी) यांना करमाळा उपजिल्हा रुग्णालयात मृत घोषित करण्यात आले. या अपघातात ४ जण जखमी झाले असून त्यांच्यावर करमाळा येथील रुग्णालयात उपचार करण्यात येत आहेत. गाडी ड्रायव्हर श्रीकांत राजकुमार चव्हाण (वय २०, गुलबर्गा) हा किरकोळ जखमी झाला असून केवळ आठ महिन्यांचा चिमुकला सुखरूप बचावला आहे तर इतर जखमींवर उपचार सुरू आहेत.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार कर्नाटकातील गुलबर्गा येथील काही भाविक भा सालसेकडून तवेरा गाडीने शिर्डी येथे साईबाबांच्या दर्शनासाठी निघाले होते, तर फारशी घेऊन जाणारं कंटेनर हा करमाळ्याकडून सालसेच्या दिशेने जात होता. आज सकाळी ६ च्या सुमारास करमाळा येथील पांडे गावच्या पुलाजवळील वळणावर कंटेनर आणि तवेराची सामोरा समोर धडक झाली. यात तवेरातील तीन जण जागेवर ठार झाले तर एकाचा दवाखान्यात मृत्यू झाला. इतर चार जण जखमी झाले आहेत.
हा अपघात एवढा भयंकर होता की अपघातानंतर गाडी पलटी झाली. अपघातानंतर कंटेनर चालक फरार झाला. अपघाताची बातमी समजताच गावातील नागरीक घटनास्थळी आले. त्यांनी तातडीने गाडीतून चौघांना बाहेर काढले. तसेच रुग्णवाहिकेतून त्यांना तातडीने दवाखान्यात नेते. यानंतर पोलीस घटनास्थळी आले. त्यांनी पंचनामा करून मदत कार्य राबवले.