Xtreme News India 26-12-2023 17:11:07 79805
देशातील सर्व रेल्वेमार्गांचे २०२३ अखेरपर्यंत विद्युतीकरण पूर्ण करण्याचे रेल्वे प्रशासनाने ठरविले आहे. त्यानुसार मनमाड ते मुदखेड दरम्यान विद्युतीकरणाचे काम मंजूर करून जालना रेल्वे स्थानकापर्यंत विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे. त्यामुळे जालना येथून जनशताब्दी एक्सप्रेस (जालना- मुंबई) ही विद्युतीकरणावर धावत आहे. या जनशताब्दी रेल्वेला प्रवाशांनी मोठी पसंती दिली आहे. दिवसा मुंबईला जाण्यासाठी जालना आणि छत्रपती संभाजीनगर येथील प्रवासी या रेल्वेला सर्वाधिक पसंत देत आहेत. या रेल्वेच्या यशस्वी प्रयोगानंतर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्या प्रयत्नातून वंदे भारत ही रेल्वे जालना येथून सुरू करण्याच्या हलचाली सुरू आहेत.
आज घडीला देशात ३४ वंदे भारत रेल्वे सुरू आहेत. आता जालना येथूनही लवकरच वंदे भारत रेल्वे सुसाट धावणार असून ती विजेवर चालणार आहे. जालना, छत्रपती संभाजीनगर येथील प्रवाशांना मुंबईला जाण्यासाठी जनशताब्दीनंतर जालना येथून ही दुसरी रेल्वे असणार आहे. नवीन वर्षात ती प्रवाशांच्या सेवेत दाखल होईल. वंदे भारत रेल्वेच्या मार्गाचे जालना रेल्वे स्थानकापर्यंत विद्युतीकरण पूर्ण झाले आहे. त्यामुळे येत्या ता.३० डिसेंबरपासून जालना ते मुंबई ही वंदे भारत रेल्वे जालना रेल्वेस्थानकावरून सुरू करण्याच्या हलचाली रेल्वे विभागाने गतिमान केल्या आहेत. त्यामुळे पुढील काळात वंदे भारत रेल्वेचा सुसाट आणि आरामदायी प्रवास प्रवाशांना अनुभवता येणार आहे. जालना ते मुंबई हे अंतर जवळपास ४२८ किलोमीटर आहे.
जालना रेल्वे स्थानकावरून ता.३० डिसेंबरपासून वंदे भारत रेल्वे ही रेल्वे नियमित पहाटे सव्वापाच वाजेच्या सुमारास धावणार आहे. ही रेल्वे सकाळी पावणेबारा वाजता मुंबई येथे दाखल होणार आहे. त्यानंतर मुंबई येथून एक ते दीडच्या दरम्यान जालन्यासाठी सुटणार आहे. ही रेल्वे सर्व सुविधांयुक्त असणार आहे. या वंदे भारत रेल्वेला आठ बोग्या (डबे) असून एकावेळी सुमारे पाचशे प्रवाशांची याद्वारे वाहतूक होणार आहे. ॲडव्हान्स बुकिंगवरच ही रेल्वे धावणार आहे.