Editor: Mr. Shrikrishna Aayacit, Executive Editor: Mr. Sanjaykumar Joshi
 Top Advertisement's

 Palghar

नववर्ष स्वागतासाठी पालघर किनारे सज्ज, पर्यटकांसाठी रिसॉर्टही सजले

Xtreme News India   26-12-2023 15:21:39   94399

नववर्ष स्वागतासाठी पालघर किनारे सज्ज,

पर्यटकांसाठी रिसॉर्टही सजले

 

पालघर दि.२६ (प्रतिनिधी) -  पालघर जिल्ह्याला १२० किमी लांबीचा समुद्रकिनारा लाभला आहे. नववर्ष स्वागसाठी अनेक पर्यटक सहकुटुंब केळवे समुद्रकिनारी येत असतात. जिल्ह्यातील न्याहारी-निवास सुविधा, हॉटेले आणि रिसॉर्टचालकांनी पर्यटकांच्या स्वागतासाठी जय्यत तयारी केली आहे. अनेक ठिकाणी तंबूची विशेष सोय करण्यात आली आहे. दरम्यान, वर्षअखेरीस पर्यटन सुविधांमध्ये ६० ते ७० टक्के बुकिंग पूर्ण झाल्याचे सांगण्यात आले.

    यावर्षी जोडून सुट्ट्या आल्याने पर्यटकांचा प्रतिसाद मोठा आहे. जिल्ह्यात समुद्रकिनाऱ्यावरील केळवे, माहीम, टेम्भी, वडराई, शिरगाव, सातपाटी, उसरणी, भादवे, दांडा, खटाळी, एडवण, कोरे, दातीवरे, मुरबे, आलेवाडी, नवापूर, उच्छळी, दांडी, उनभाट, तारापूर, चिंचणी, वरोर, धाकटी डहाणू, डहाणू, चिखला, घोलवड, बोर्डी, झाई, अर्नाळा, नायगाव, वसई याचबरोबर जंगलपट्टी भागातील तलासरी, डहाणू, पालघर, वाडा, जव्हार, मोखाडा, विक्रमगड तालुक्यांतील हॉटेल व रिसॉर्टचालकांनी जय्यत तयारी केली आहे.

    सरकारी, निमसरकारी आणि खासगी क्षेत्रातील अधिकारी-कर्मचारी यांना सलग तीन-चार दिवस सुट्टी असल्याने जिल्ह्यातील किनारपट्टी तसेच जंगलपट्टी भागातील हॉटेले, न्याहारी-निवास सुविधा आणि रिसॉर्ट यांचे बुकिंग मोठ्या प्रमाणात झाले आहे. डिसेंबरच्या २८, २९ तारखेपासून पर्यटकांच्या आगमनाला सुरुवात होणार आहे. यातील बहुतेकांनी एक जानेवारीपर्यंतचे बुकिंग केले आहे. त्यामुळे यावर्षी मोठ्या प्रमाणात पर्यटकांचा लोंढा या संपूर्ण किनारपट्टीसह जंगलपट्टीमध्ये पाहावयास मिळणार आहे.पर्यटकांचा हिरमोड होऊ नये, या दृष्टीने पोलिस प्रशासन तसेच उत्पादन शुल्क विभाग आणि पर्यटन विभागाने सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने आपली यंत्रणा राबवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत.

    केळवे बीच हे जिल्ह्याचे 'टुरिझम मॉडेल' समजले जाते. नितांतसुंदर किनारे, टुमदार गावे, सुरूच्या झाडांचे बगीचे, पर्यटकांच्या निवासासाठी विशेष सुविधा, पारंपरिक जेवण यांमुळे दरवर्षी हजारो पर्यटक केळवेला भेट देतात. अनेक पर्यटक वर्षातून अनेकदा केळव्याला भेट देतात. सरकारने पर्यटन विकासासाठी येथील पायाभूत सुविधांना बळ दिल्याने रोजगारालाही चालना मिळाली आहे.

    पालघर जिल्ह्यातील अन्य समुद्रकिनारेही निसर्गरम्य असून केळवेच्या धर्तीवरच या पर्यटनस्थळांचा विकास होणेही गरजेचे आहे. तिथे स्वच्छता राखण्यासाठी प्रयत्न होणे गरजेचे आहे. पालघर जिल्ह्यात सद्यस्थितीत अनेक विकास प्रकल्प होऊ घातले आहेत. विरारला पालघर तालुक्याशी जोडणाऱ्या प्रस्तावित पुलामुळे मुंबईतून येण्याच्या पर्यटकांना पालघर जिल्ह्यातील किनाऱ्यावर येणे सुलभ, सोयीस्कर होणार आहे. भविष्यात पर्यटकांच्या लोंढ्यांचा विचार करून सरकारने आतापासून या पर्यटनस्थळांच्या विकासाचा आराखडा तयार करणे गरजेचे आहे. या ठिकाणी भविष्यात पर्यटन हाच मुख्य व्यवसाय राहणार असल्याने सरकारने त्यादृष्टीने प्रशिक्षण केंद्रे उभारणे, तरुणांमध्ये जनजागृगी करून त्यांना रोजगारासाठी प्रोत्साहित करणे गरजेचे आहे. मूलभूत सुविधांबरोबर पर्यटकांना आकर्षित करण्यासाठी म्युझियम, मत्स्यालय, ग्रामीण भागातील संस्कृती दाखवणारी केंद्रे, स्थानिक फळे, शेतीमाल, व ग्रामीण मालाच्या विक्रीसाठी व्यावसायिक बाजारपेठ निर्माण करणे, स्थानिक सांस्कृतिक कार्यक्रम, आदिवासी नृत्य यांना प्रोत्साहन देणे, पर्यटन महोत्सव आयोजनासाठी चालना देणे, स्वयंरोजगार निर्मितीसाठी आवश्यक परवानग्या सुलभरीतीने देणे गरजेचे आहे, याकडे लक्ष वेधण्यात येत आहे.


Contact For News & Advertisement.


 Your Feedback



 Advertisement