नंदुरबार जिल्ह्यात स्थानिकांना
प्राधान्याने रोजगार देणार– उद्योग मंत्री उदय सामंत
नागपूर दि.१६ (प्रतिनिधी) - नंदुरबार जिल्ह्यात स्थानिकांना महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या माध्यमातून औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रशिक्षण देऊन प्राधान्याने रोजगार उपलब्ध करून देण्यात येणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी विधानपरिषदेत दिली.नंदुरबार जिल्ह्यात रोजगार निर्मितीसाठी औद्योगिक क्षेत्र कार्यान्वित करण्याबाबतचा प्रश्न सदस्य आमश्या पाडवी यांनी उपस्थित केला होता. त्यावेळी उद्योग मंत्री उदय सामंत बोलत होते. या चर्चेत सदस्य सर्वश्री सचिन अहीर, सत्यजित तांबे आदींनी सहभाग घेतला होता.
उद्योग मंत्री उदय सामंत म्हणाले की, भालेर औद्योगिक क्षेत्रात 285.58 हेक्टर आर क्षेत्रात महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळामार्फत विकास कामे करण्यात आले असून एकूण 409 भूखंडाचे आरेखन केले आहे. त्यापैकी 55 भूखंडाचे वाटप झालेले आहे. एका भूखंडावर बांधकाम सुरू आहे. नवापूर औद्योगिक क्षेत्रात 64.19 हेक्टर आर क्षेत्रावर औद्योगिक क्षेत्र विकसित करण्यात आले आहे. यामध्ये 198 भूखंडाचे आरेखन करून 191 भूखंडाचे वाटप झालेले आहे. सात भूखंड शिल्लक आहेत 0.97 भूखंडावर टेक्स्टाईल उत्पादन सुरू आहे. यामध्ये सुमारे 1738 इतका स्थानिकांना रोजगार निर्माण झालेला आहे.
अतिरिक्त नवापूर औद्योगिक क्षेत्रात मे. जनरल पॉलिफिम्स प्रा.लि.(मेगा प्रोजेक्ट) यांच्याकडून 700 कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येत आहे. या उद्योगात प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष एक हजार एवढा रोजगार निर्माण होणार आहे.