धोम धरणाचा डावा कालवा फुटला,
पाण्याच्या प्रचंड लोंढ्यात ऊसतोड कामगारांचा संसार वाहून गेला
सातारा दि. १६ (प्रतिनिधी) - वाई तालुक्यातील धोम धरणाचा डावा कालवा पांडे गावच्या हद्दीत लेंडी पुलाजवळ मध्यरात्री तीन वाजण्याच्या सुमारास फुटल्याने मोठ्या प्रमाणावर पाणी ओझर्डे गावच्या चंद्रभागा ओढ्यात शिरले. ओढ्याला पुराचे स्वरूप आले असून यात झोपेत असलेल्या ऊसतोडणी मजुरांचा संसार वाहून गेला आहे. दोन बैलांची शोध मोहीम सुरू असून १२ बैल वाचवण्यात यश आले आहे.
पांडे (ता वाई) गावच्या हद्दीत धोम धरणाचा डावा कालव्याचा भराव वाहून आज पहाटे कालवा फुटला. हजारो क्युसेक्स पाणी ओझर्डे येथील चंद्रभागा ओढ्यातून वाहत आहे. शेती पिकाच्या पाण्याचा प्रश्न गंभीर असताना कालवा फुटल्याने शेतकऱ्यांनी संताप व्यक्त केला. कालव्यातून साडेपाचशे क्युसेक्स पाणी वाहत होते. कालवा तातडीने बंद करण्यात आला. पाण्याचा प्रवाह एवढा मोठा होता की कालव्यातील पाणी शेतातून थेट चंद्रभागा ओढ्याच्या पात्रात घुसले. शेतीचे नुकसान करत हे पाणी ओढ्यात घुसले. ओढ्याचे पात्र मोठे असल्याने व ओढ्याला पाणी नसल्याने ऊसतोड मजुरांच्या झोपड्या, बैल, बैलगाड्या होत्या. दिवसभर ऊसतोड करून झोपलेल्या पस्तीस ऊसतोड मुजरांच्या दीडशे लोकांच्या झोपड्यांत पाणी शिरले. त्यांचे संसार उपयोगी साहित्य व १४ बैल वाहून गेले. अचानक ओढ्याला पूर आल्याने व झोपड्यात पाणी घुसल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. बारा बैल वाचवण्यात यश आले. दोन बैल बेपत्ता झाले होते त्यांची शोध मोहीम राबवून जेसीपीच्या साहाय्याने त्यांना बाहेर काढण्यात आले. या घटनेत जीवित हानी झाली नाही मात्र ऊसतोड मजुरांच्या झोपड्या व त्यांचे संसार उपयोगी साहित्य वाहून गेले.
कालवा फुटून झालेल्या नुकसानीची माहिती मिळताच पाटबंधारे विभागाचे अधिकारी, वाईचे प्रांताधिकारी राजेंद्रकुमार जाधव, तहसीलदार सोनाली मेटकरी, नायब तहसीलदार वैशाली घोरपडे – जायगुडे, भुईंज पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे किसन वीर कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे व त्यांचे अधिकारी, लगतचे ग्रामस्थ हे तत्काळ घटनास्थळी ऊसतोड मजुरांना मदतीसाठी पोहोचले. प्रशासनाकडूनही त्यांना मदत देण्याचे काम सुरू होते. त्यांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आले आहे. पाऊस कमी झाल्याने साताऱ्यात आधीच दुष्काळसदृश परिस्थिती असताना शेतीसाठी धोम धरणातून कालव्याद्वारे पाणी सोडले आहे. अद्याप किती नुकसान झाले याची माहिती मिळू शकली नाही. पाण्याच्या प्रवाहने माती खचून कालवा फुटला. तत्काळ कालवा दुरुस्तीचे काम करण्यात येणार असून शेतीसाठी पाणी सोडण्यात येईल, असे पाटबंधारे अधिकाऱ्यांनी सांगितले.