हवामान बदलामुळे रब्बी पिकांवर कीडरोगाचा प्रादुर्भाव,
कृषी विभागाने लक्ष देण्याची मागणी
छत्रपती संभाजीनगर दि. १५ (प्रतिनिधी) - तालुक्यात आठवड्यात हवामान बदल झाल्याने रब्बीतील पिकांना कीडरोगाचा प्रादुर्भाव झाला. त्यावर प्रतिबंधात्मक उपायांसाठी शेतकरी कृषी केंद्रात जाऊन महागडे कीटकनाशक खरेदी करीत असले, तरी त्याचा कीडरोगावर प्रभाव पडत नसल्याने शेतकरीवर्ग मेटाकुटीस आला आहे. या गंभीर प्रकाराकडे कृषी विभागाकडून दखल घेतली जात नसल्याने पिके धोक्यात आली आहेत.
खरीपातील पिकाला अल्प पर्जन्यमान झाल्याने उत्पन्नावर त्याचा परिणाम झाला होता. यंदा रब्बीच्या पेरण्या होणारच नाहीत, असे वाटत असताना तालुक्यात तीन ते चार दिवस अवकाळी पावसाने हजेरी लावली. अल्प पर्जन्यमानामुळे खरीपही हातचे गेले व पाणी नसल्याने रब्बीचेही पिक घेता येणार नसल्याने शेतकरी वर्ग कमालीचा चिंतेत होता. मात्र, अवकाळीने हजेरी लावल्याने कपाशी, मका पिकाचे नुकसान झाले.
पावसाने उसंत दिल्यानंतर, शेतात वापसा आल्यानंतर शेतकऱ्यांनी हरभरा; तसेच थोड्याफार प्रमाणात गहू पिकाची पेरणी केली. काहींची पेरणी सुरू आहे. रब्बी हंगामातील पीक साथ देईल, या आशेवर शेतकरी महागडे बी-बियाणे, खते घेऊन अल्प ओलितावर सहा हजार ६६५ हेक्टर क्षेत्रावर पेरणी केली. त्यामध्ये हरभरा, गहू, तूर पिकांची पेरणी केली आहे.
पीक जोमाने वाढले जात असताना तालुक्यात गेल्या आठवड्यात ढगाळ वातावरण निर्माण झाल्याने रब्बी हंगामातील हरभरा पिकावर घाटेआळीचा प्रादुर्भाव झाला. ज्वारी पिकावर शेंडेअळी पडली आहे; तसेच खरीप हंगामातील तूर पीक बहरात असून, त्यावर शेंगा पोखरणाऱ्या अळीचा मोठ्या प्रमाणावर फैलाव झाला असल्याने त्यावर नियंत्रण करण्यासाठी शेतकरी शहरातील, ग्रामीण भागातील कृषी केंद्रात जाऊन कीटकनाशक फवारणी करीत आहेत. मात्र, त्यावर प्रभाव पडत नसल्याने शेतकऱ्यांची पिके संकटात सापडली आहेत.
तालुक्यातील शेतकरीवर्गांना कृषी विभागाकडून योग्य मार्गदर्शनासाठी शेतीशाळा घेऊन प्रत्येक पिकांवरचे कीडरोग प्रादुर्भावासंदर्भात माहिती प्रत्येक गावात जाऊन देणे गरजेचे असताना त्याकडे कृषी विभागाचे दुर्लक्ष होत आहे.