नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमध्ये कांद्यांचे लिलाव पुन्हा सुरु,
कांद्याचे भाव घसरले
नाशिक दि. १४ (प्रतिनिधी) - कांदा निर्यातबंदी लागू करण्यात आल्यानंतर व्यापाऱ्यांनी केंद्र सरकारच्या या निर्णयाचा निषेध केला. त्यासाठी कांद्याचे लिलाव बंद ठेवण्यात आले होते. पंरतु नाशिक जिल्ह्यातील लासलगाव बाजार समितीसह जिल्ह्यातील इतर बाजारसमित्यांमध्ये पुन्हा लिलावांना सुरुवात झाली. पण लिलाव जरी सुरु झाले तरी कांद्यांचे भाव मात्र घसरले. कांदा निर्यातबंदी निर्णयाच्या विरोधात गेल्या तीन दिवसांपासून कांद्याचे बंद असलेले लिलाव शेतकऱ्यांच्या मागणीनुसार आज सुरू झाले.पण कांद्याचे भाव घसरल्यामुळे पुन्हा एकदा शेतकरी वर्ग चिंतेचं वातावरण पाहायला मिळत आहे.
कांद्याला सरासरी 1900 ते 2000 रुपये भाव मिळाल्याने शेतकऱ्यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. सोमवार 11 डिसेंबर रोजी लालसगाव बाजार समितीमध्ये 400 वाहनातून सहा ते सात क्विंटल कांद्याची आवाक झाली होती. कांद्याला जास्तीत जास्त 2661 रुपये म्हणजेच सरासरी 1900 रुपये तर कमीत कमी 800 रुपये इतका प्रतिक्विंटल भाव मिळाला. त्यामुळे केंद्र सरकारने कांदा निर्यातबंदीच्या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी यावेळी कांदा उत्पादक शेतकऱ्यांनी केली आहे.
सलग तीन दिवस कांदा लिलाव बंद ठेवले तर परवाना रद्द करण्यता येईल असे निर्देश सहकार विभागाकडून देण्यात आले होते. त्याच पार्श्वभूमीवर व्यापाऱ्यांनी पुन्हा कांद्यांचे लिलाव सुरु केलेत. सर्व जिल्ह्यातील कांद्याचे लिलाव बंद झाल्यानंतर सहकार विभागने सर्व जिल्ह्यांच्या स्तरावर हा निर्णय घेतला होता. त्यातच नाशिक जिल्ह्यात सर्वाधिक कांद्याचे व्यवहार बंद असल्याचे निरीक्षण सहकार विभागाने नोंदवले होते.
यंदाच्या वर्षात आधी अतिवृष्टी त्यानंतर अवकाळी पाऊस यामुळे शेतकऱ्यांवर आस्मानी संकट कोसळले होते. त्यातच आता केंद्र सरकारने पुन्हा एकदा शेतकऱ्यांवर निर्यातबंदीची कुऱ्हाड चालवल्याचं चित्र आहे. वळपास 80 टक्के कांद्याला अवकाळी व गारपिटीची तडाखा बसला. फक्त 20 टक्केच कांदा वाचला.त्यानंतर कांद्याला चांगला भाव देखील मिळू लागला होता. लाल कांद्याला चार ते साडेचार हजार रुपये प्रतिक्विंटल समाधानकारक भाव मिळत असल्याने उरलेल्या कांदा विक्रीतून उत्पादन खर्च तरी निघेल अशी आशा शेतकऱ्यांना होती.मात्र केंद्र सरकारने 31 मार्चपर्यंत कांदा निर्यात बंदीचा निर्णय घेतल्याने आता उरलेला कांदाही कवडीमोल भावाने विकावा लागणार असल्याने शेतकरी हतबल झाला आहे.