छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात पीककर्जाचे
१४५ कोटी रुपये वाटप
छत्रपती संभाजीनगर दि. १४ (प्रतिनिधी) - जिल्ह्यातील शेतकऱ्यांना रब्बी हंगामासाठी पैसा उपलब्ध व्हावा, यासाठी जिल्हा सहकारी; तसेच राष्ट्रीयकृत बँकांना यंदा ८११ कोटी १२ लाख रुपयांचे पीक कर्ज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यात आतापर्यंत १४४ कोटी ९६ लाख रुपयांचे वाटप करण्यात आले आहे. दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण १७. ८७ टक्के आहे. शेतकऱ्यांची हक्काची बँक असलेल्या जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेने आतापर्यंत केवळ ६० लाख रुपयांचे (०.२० टक्के) कर्ज वाटप केले आहे.
खरीप असो की रब्बी हंगाम पेरणी, आंतर मशागत, फवारणीपासून ते काढणीपर्यंत शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात पैसा खर्च करावा लागतो. हाती पैसा नसेल, तर शेतकरी हवालदिल होतो. अशा वेळी तो सावकारी पाशात अडकण्याची भीती असते. हीच बाब लक्षात घेऊन या महत्त्वाच्या हंगामात शेतकऱ्यांना पैसा उपलब्ध व्हावा, यासाठी पीक कर्ज वाटपाचे नियोजन सरकारी स्तरावर केले जाते. हंगाम सुरु होण्यापूर्वीच नियोजनासाठी आढावा बैठकही घेतल्या जातात.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक, राष्ट्रीयकृत व खासगी व्यापारी बँकांना; तसेच ग्रामीण बँकेला पीक कर्ज वाटपाचे उद्दिष्ट दिले जाते. त्यानुसार रब्बी हंगामासाठी येथील जिल्हा सहकारी बँकेसह अन्य बँकांना मिळून ८११ कोटी १२ लाख रुपयांचे पीक कर्ज पुरवठा करण्याचे उद्दिष्ट देण्यात आले आहे. यात जिल्हा मध्यवर्ती सहकाही बँकेला २९६ कोटी ६० लाख रुपयांचे कर्ज वाटपाचे लक्षांक देण्यात आला आहे. या बँकेने ११ डिसेंबरपर्यंत १६० सभासद शेतकऱ्यांना मिळून केवळ ६० लाख रुपयांचे पीककर्जाचे वाटप केले. दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण ०.२० टक्के आहे.
राष्ट्रीयकृत व खासगी व्यापारी बँकांना ४११ कोटी ६१ लाख रुपयांचे कर्जवाटपाचे उद्दिष्ट असताना त्यांनी १४ हजार १५३ शेतकऱ्यांना मिळून १३८ कोटी ११ लाख रुपयांचे (३३.५५ टक्के) कर्ज वाटप केले. ग्रामीण बँकेला रब्बी कर्ज वाटपाचे उद्दिष्ट १०२ कोटी ९१ लाख दिलेले असताना त्यांनी आतापर्यंत सहा कोटी २५ लाख रुपयाचे (६.०७ टक्के) कर्ज वाटप केले. अशा प्रकार जिल्ह्यात आतापर्यंत एकूण १४ हजार ९१४ शेतकऱ्यांना रब्बी पेरणीसाठी १४४ कोटी ९६ लाखांचे पीक कर्जाचे वाटप करण्यात आले असून, दिलेल्या उद्दिष्टाच्या तुलनेत हे प्रमाण केवळ १७.८७ टक्के आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.