दुष्काळ पाहणीसाठी केंद्रीय पथक आजपासून मराठवाड्यात
छत्रपती संभाजीनगर दि.१३ (प्रतिनिधी) - आजपासून दुष्काळाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथकाच्या दोन टीम विभागात दाखल झाल्या आहेत. हे पथक दोन दिवस मराठवाड्यातील चार जिल्ह्यात पाहणी करणार आहेत. या दोन टीममध्ये एकूण पाच सदस्यांचा समावेश असून, नऊ तालुक्यातील काही गावांना भेटी देऊन प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी संवाद साधणार आहेत.
राज्यातील दुष्काळाच्या पाहणीसाठी केंद्राचे पथक राज्यात दाखल झाले आहे. केंद्रीय पथकामध्ये सहसचिव प्रिया राजन यांच्यासह ९ मंत्रालयातील १२ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. केंद्रीय पथकाच्या उपस्थित मंगळवारी पुणे येथील विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक झाली. या बैठकीमध्ये विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड यांनी मराठवाडा विभागातील चार जिल्ह्यांच्या दुष्काळी परिस्थिबाबत माहिती दिली. या बैठकीला विभागाचे सह संचालक तुकाराम मोटे यांचीही उपस्थिती होती. या बैठकीनंतर दोन टीम तयार करण्यात आल्या आहेत. एक टीम छत्रपती संभाजीनगर आणि जालना येथे दुसरी टीम बीड आणि धाराशीव या जिल्ह्यातील काही तालुके व गावांना हे पथक भेट देणार आहे. पहिल्या टीममध्ये जलसंपदा विभागाचे हरीश उंबरजे आणि कापूस विकास विभागाचे ए. एल. वाघमारे यांचा समावेश आहे. तर दुसऱ्या टीममध्ये उपसचिव मनोज के., नीती आयोगाचे शिवचरन मिना आणि मोतीराम यांचा समावेश आहे.