नाशिककरांचा प्रवास होणार आणखी आनंदी, राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात
नव्याने १६७ शिवाई बस लवकरच दाखल होणार
नाशिक दि. १३ (प्रतिनिधी) - राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या ताफ्यात नव्याने १६७ शिवाई बस लवकरच दाखल होणार आहेत. त्यामुळे पुण्यासह अनेक मार्गांवर जाणाऱ्या प्रवाशांची सोय होणार आहे. या बस चार्जिंग करण्यासाठी शहरात एन. डी. पटेल रोडवर चार्जिंग स्टेशन आहे. परंतु, बसची संख्या वाढणार असल्याने मालेगाव आणि सटाणा येथेही चार्जिंग स्टेशन उभारण्यात येणार असल्याची माहिती एसटी महामंडळातील सूत्रांनी दिली.
प्रवाशांच्या सेवेसाठी' असे ब्रीद घेऊन धावणाऱ्या राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या बसेसमध्ये शिवाई या इलेक्ट्रिक बसची भर पडली आहे. नाशिक विभागासाठी ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यात दोन बस प्राप्त झाल्या. प्रवाशांची सर्वाधिक गर्दी असलेल्या पुणे मार्गावर त्या सोडण्यात आल्या. यानंतर पुन्हा काही बस महामंडळाला मिळाल्या. सध्या महामंडळाच्या ताफ्यात आठ शिवाई बस आहेत. सरकारने महिला, ज्येष्ठ नागरिकांसह अनेक घटकांना बस प्रवासात सवलत दिली असल्याने महामंडळाच्या बसने जाणाऱ्या प्रवाशांची संख्या वाढली आहे. तुलनेने बसची संख्या मर्यादीत असल्याने प्रवाशांना गैरसोयीचा सामना करावा लागतो. सरकार राज्यासाठी मोठ्या प्रमाणावर नवीन शिवाई बसेसची खरेदी करणार असून, नाशिकच्या वाट्यालाही १६७ बस येणार आहेत. लवकरच प्रवाशांची प्रतीक्षा संपुष्टात येणार आहे.