दुष्काळाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक १३ डिंसेबरला मराठवाड्यात दाखल होणार,
पाहणी दौऱ्याच्या तयारीबाबत विभागीय आयुक्तांची सूचना
छत्रपती संभाजीनगर दि.१२ (प्रतिनिधी) - राज्यातील दुष्काळाच्या पाहणीसाठी ११ ते १५ डिसेबर दरम्यान केंद्राचे पथक राज्यात येणार आहे. दुष्काळाच्या पाहणीसाठी केंद्रीय पथक १३ आणि १४ डिसेंबर रोजी मराठवाड्यात दाखल होणार आहे. या दौऱ्याच्या अनुषंगाने सोमवारी विभागीय आयुक्त मधुकरराजे अर्दड यांनी विभागातील अधिकाऱ्यांशी व्हीसीद्वारे संवाद साधत आढावा घेत सूचनाही केल्या.
१३ आणि १४ डिसेंबर रोजी मराठवाड्यातील चार जिल्ह्यांची प्रत्यक्ष पाहणी दोन टीम करणार आहेत. केंद्रीय पथकामध्ये सहसचिव प्रिया राजन यांच्यासह ९ मंत्रालयातील १२ वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश आहे. या दौऱ्याच्या अनुषंगाने विभागीय आयुक्तांनी व्हीसीद्वारे विभागातील जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधला. या बैठकीला महसूल उपायुक्त डॉ. अनंत गव्हाणे, कृषी विभागाचे सह संचालक तुकाराम मोटे यांचीही उपस्थिती होती. विभागाचा सरासरी पाऊस, जून ते ऑक्टोबर दरम्यान पडलेला पाऊस, पावसाचा खंड, पिकांची स्थिती, भूजल पातळी, छोट्या-मोठ्या प्रकल्पांचा जलसाठा याची कृषी विभागाने गोळा केलेली आकडेवारी विभागीय आयुक्तांसमोर मांडण्यात आली. यावेळी विभागीय आयुक्तांनी जिल्हाधिकाऱ्यांना अनेक सूचनाही केल्या.दरम्यान, दुष्काळाची दाहकता, परिमाण केंद्रीय पथकाला दाखविता येईल, अशाच जागांची निवड करण्याबाबत नियोजन केले जात असल्याचे समजते.