रेल्वे गाड्यांची संख्या वाढल्याने पडतोय ताण,
लोहमार्ग पोलिसांची शेकडो पदे रिक्त
छत्रपती संभाजीनगर दि. ११ (प्रतिनिधी) - लोहमार्ग पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या एक हजार ७९३ किलोमीटर रेल्वे मार्गावर धावणाऱ्या रेल्वे प्रवाशांची संख्याही लाखोंपेक्षा अधिक आहे. या लाखो प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी असलेल्या लोहमार्ग पोलिसांवर आहे. लोहमार्ग पोलिस अधीक्षकअंतर्गत जवळपास दहा पोलिस ठाणे, वीस आउट पोस्ट असा मोठा कारभार हा फक्त ६२० कर्मचाऱ्यांच्या जीवावर चालविण्यात येत आहे.
छत्रपती संभाजीनगर पोलिस अधीक्षक कार्यालयाच्या अंतर्गत परळी, छत्रपती संभाजीनगर, नंदूरबार, भुसावळ, चाळीसगाव, इगतपुरी, मनमाड, नांदेड, नाशिकरोड आणि शेवगाव असे दहा पोलिस ठाण्यातून कारभार करण्यात येत आहे.गेल्या काही वर्षांत विविध मार्गांवर रेल्वेची संख्या वाढत चालली आहे. रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचीही संख्या वाढलेली आहे. या प्रवाशांच्या सोबत होणाऱ्या विविध चोरी किंवा इतर घटनांही वाढत चाललेल्या आहेत. या घटनांशिवाय रेल्वे स्टेशनवर प्रवाशांच्या सुरक्षेची जबाबदारी लोहमार्ग पोलिसांना पार पाडावी लागत आहे.
रेल्वेच्या प्रवासादरम्यान किंवा रेल्वे स्टेशनवर घडलेल्या एका घटनेचा तपास करण्याची जबाबदारी सदर कर्मचाऱ्यांवर असते. रेल्वेतून प्रवाशांची सुरक्षा योग्य प्रकारे व्हावी. यासाठी जिल्ह्याच्या मुख्य रेल्वे स्टेशन येथे पोलिस ठाणे देण्यात आलेले आहे. याशिवाय आउट पोस्टही तयार करण्यात आले आहे. या आउट पोस्ट येथेही पोलिस कर्मचाऱ्यांची तैनात केले जाते.
या पोलिस कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून सुरक्षेची जबाबदारी असते. एका पोलिस ठाण्याच्या अंतर्गत धावणाऱ्या रेल्वेवर लक्ष ठेवणे; तसेच गर्दीचा फायदा घेऊन चोरी करणाऱ्या चोरांवर अंकुश ठेवण्यात येतो. या कामासाठी सध्या लोहमार्ग पोलिसांकडे कर्मचारी संख्या अपुरी पडत आहे. सर्वसामान्य पोलिस कर्मचाऱ्यांना रेल्वे स्टेशनवर प्रवाशांची सुरक्षेसह, गुन्हेगार शोधासह न्यायलयीन प्रक्रियेनंतरही काही महत्त्वाच्या घटनांच्या वेळी उपस्थितीत राहावे लागत आहे. सध्या छत्रपती संभाजीनगर लोहमार्ग पोलिस अधीक्षक कार्यालयात ६२० कर्मचारी आहेत. या कर्मचाऱ्यांद्वारे सध्या प्रवाशी सुरक्षेचे काम करावे लागत आहे. सध्या या कार्यालयाकडे सुमारे दीडशे कर्मचारी कमी आहेत. या कमी कर्मचारी संख्येतही लोहमार्ग पेालिसांना आपले कर्तव्य बजजावे लागत आहे. परिणामी त्यांच्यावर ताण येत आहे.