रस्त्यावर दूध ओतत शेतकऱ्यांचा सरकारवर निषेध,
दुधाला ४० रुपये भाव देण्याची मागणी
छत्रपती संभाजीनगर दि. ११ (प्रतिनिधी) - अडगाव बुद्रुकमधून छत्रपती संभाजीनगरमध्ये मोठ्या प्रमाणात दूध पुरवठा होतो. अडगावमधील शेतकऱ्यांकडून दररोज सहा ते सात हजार लिटर दूध शहरात पुरविले जाते. शेतकऱ्यांनी भाववाढीबाबत निर्णय न झाल्यास शेतकऱ्यांनी शहराला होणारा दूध पुरवठा बंद करून, आंदोलन अधिक तिव्र पद्धतीने करण्याचा इशारा दिला.'दुधाला ४० रुपयांचा भाव द्यावा,' अशी मागणी करून आडगाव बुद्रुक गावातील शेतकऱ्यांनी रस्त्यावर दूध ओतून सरकारचा निषेध व्यक्त केला. सरकारने आठ दिवसांत दरवाढीचा निर्णय घेतला नाही, तर धुळे-सोलापूर रस्तावर उतरून आंदोलन करू, शहराचा दूध पुरवठा बंद करू, असा इशारा शेतकऱ्यांनी दिला.
सरकारकडून दुधाला योग्य भाव मिळत नसल्याने दुग्धव्यवसाय करणाऱ्या शेतकऱ्यांसमोर मोठे आर्थिक संकट उभे राहिले आहे. ३८ रुपयांवरून २४ रुपये भाव करण्यात आला असून, दुधाचे चाळीस रुपये असा जाहीर करावा, यासाठी रविवारी शेतकरी रस्त्यावर उतरले. सकाळी नऊच्या सुमारास आडगाव येथे शेतकरी बांधवांनी दूध रस्तावर टाकून सरकारचा निषेध केला. 'दुधाला योग्य भाव द्या, शेतकऱ्यांना न्याय द्या, ४० रुपयांचा भाव जाहीर करा,' अशा मागण्यांबाबत घोषणाबाजी करून शेतकऱ्यांनी आंदोलन केले. शहराला सर्वाधिक पुरवठा आडगाव बुद्रुकसह परिसरातील गावांमधून होतो; परंतु दर नसल्याने अडचणींचा सामना करावा लागत असल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. या वेळी जगदीश डवले, कडुबा पठाडे, गणेश हाके, किशोर दसपुते, शिवाजी वाघ, शंकर नागरे, कृष्णा पठाडे, विश्वंभर हाके, विलास शेळके, माऊली दसपुते आदींसह शेकडो शेतकरी उपस्थित होते.