बुलढाणा जिल्ह्यातील बोदवड उपसा सिंचन योजनेसाठी
५६३ कोटींचा निधी मंजूर
बुलढाणा दि. १० (प्रतिनिधी) - बुलढाणा जिल्ह्यातील बोदवड उपसा सिंचन योजना मार्गी लागली असून यासाठी तब्बल ५६३ कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यामुळे जिल्ह्यातील १३ हजार ७४३ हेक्टर क्षेत्राला सिंचनाचा लाभ होणार आहे.जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा सिंचनाचा प्रश्न मार्गी लागावा या दृष्टिकोनातून खासदार प्रतापराव जाधव यांनी सातत्याने योजनेचा पाठपुरावा केला आहे. त्यांचे प्रयत्न यशस्वी ठरले असून केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयाने योजनेला मंजुरी दिली आहे.
केंद्र शासनाच्या सार्वजनिक गुंतवणूक मंडळाच्या बैठकीत तापी पाटबंधारे विकास महामंडळ अंतर्गत असलेल्या बोदवड परिसर सिंचन योजना टप्पा एकचा समावेश केंद्राच्या योजनेत करण्यात आला आहे. पहिल्या टप्प्याची किंमत २ हजार १४१ कोटी १९ लाख रुपये आहे. विदर्भातील ६ हजार १६७ हेक्टर, अवर्षणप्रवण भागातील ९ हजार ५०७ तर सर्वसाधारण क्षेत्रातील ६ हजार ५४६ मिळून १३ हजार ७४३ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येईल.
सततच्या पाठपुराव्याने योजनेचा मार्ग मोकळा झाला असून कृषिप्रधान बुलढाणा जिल्ह्यासाठी ही महत्त्वाची बाब असल्याची प्रतिक्रिया खासदार जाधव यांनी दिली. मंजूर ५३६ कोटी ६४ लाख रुपये येत्या तीन वर्षांत केंद्रामार्फत मिळणार आहे. उर्वरित ५४३ कोटी ३५ लाख रुपये राज्य शासन खर्च करणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.