नागपूर जिल्ह्यासाठी एक महत्वपूर्ण बातमी,
'दवाखाना आपल्या दारी' हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु
नागपूर दि. १० (प्रतिनिधी) - नागपूर जिल्ह्यासाठी एक महत्वपूर्ण आणि दिलासादायक बातमी आहे. 'शासन आपल्या दारी' नंतर आता शासनाने नागपूर जिल्ह्यात ९ डिसेंबरपासून 'दवाखाना आपल्या दारी' हा नाविन्यपूर्ण उपक्रम सुरु केला आहे. या अंतर्गत मोबाईल दवाखाना म्हणजे खास रूग्णवाहिका जिल्ह्यातील प्रत्येक गावात जाणार आहे. त्यासाठी नागपूर जिल्ह्यात खनिज निधीतून 26 खास रूग्णवाहिका तयार करण्यात आल्या आहेत. या रूग्णवाहिकासोबत डॉक्टर, परिचारिका आणि इतर तंत्रज्ञ अशी टीम प्रत्येक गावात जाणार आहे. आरोग्य सेवेला प्रत्येक गावात नेण्याचा हा राज्यातील पहिलाच प्रकल्प आहे.
ग्रामीण भागात फारशा आरोग्य सेवा उपलब्ध नसल्याने, लोकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. वेळेवर उपचार मिळत नसल्यानं काही वेळा जीवही गमवावा लागतो. यावर उपाय म्हणुन राज्यातील पहिला 'दवाखाना आपल्या दारी' हा उपक्रम नागपूर जिल्ह्यात आजपासून सुरु झाला आहे. या योजनेतून सुसज्ज आरोग्य सुविधा, औषध असलेल्या 26 गाड्या नागपूर जिल्ह्यात देण्यात आल्या आहेत. जिल्ह्यातील प्रत्येक गावात दवाखाना आपल्या दारी जाऊन लोकांना निःशुल्क उपचार आणि त्यांना औषधं देणार आहेत. प्राथमिक स्थरावरील नऊ आजारांचा उपचार आणि औषध दिली जाणार आहे.