समृद्धी महामार्गावर १६ ठिकाणी पेट्रोलपंप, स्वच्छतागृह, उपहारगृह
आदी सोयी सुविधांची निर्मिती करण्यात येणार
नागपूर दि. ९ (प्रतिनिधी) - समृद्धी महामार्गावर प्रवास सुखकर व्हावा यासाठी महिनाभरात या मार्गावर १६ ठिकाणी पेट्रोलपंप, स्वच्छतागृह, उपहारगृह आदी सोयी सुविधांची निर्मिती करण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री दादा भुसे यांनी शुक्रवारी विधानपरिषदेत दिली. सध्या या सुविधा नसल्याने प्रवाशांना विविध अडचणींचा सामना करीत प्रवास करावा लागतो. या सुविधांमुळे समृद्धीवर प्रवास सुखकर होणार आहे.
विधानपरिषद सदस्य अमोल मिटकरी यांनी समृद्धी महामार्गावरील अपघातांकडे लक्ष वेधले. यावेळी मिटकरी यांच्यासह विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, अनिकेत तटकरे व इतर सदस्यांनीही महामार्गावरील अपघात व त्यासाठी आवश्यक उपाययोजनांसंबंधी प्रश्न उपस्थित केले. समृद्धी महामार्गावर प्रवाशांसाठी आवश्यक उपाययोजना करण्यापूर्वीच तो सुरू करण्यात आला. त्यामुळे या मार्गावरून प्रवास करणाऱ्यांना काही अडचणी आल्यास, अपघात झाल्यास अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत असून त्यासंबंधी उपाययोजना करणे अत्यंत आवश्यक असल्याची मागणी त्यांनी केली. यावेळी दादा भुसे यांनी येत्या दीड महिन्यात या मार्गावर पेट्रोलपंप, स्वच्छतागृहे, प्रवासादरम्यान काही काळ थांबण्यासाठी उपहारगृहे व इतर आवश्यक सोयी सुविधांची निर्मिती करण्यात येणार आहे, अशी माहिती दिली.
समृद्धी महामार्गावर होणारे अपघात वाहतूक नियमांचे उल्लंघन करणे, अतिवेगाने वाहन चालवण्यामुळेच होत आहेत. त्यामुळे यासाठी मार्गावर ठिकठिकाणी ‘मेटल क्रॅश बॅरियर्स, बसविण्यात येत आहेत. ७० टक्के काम पूर्ण झाले आहे. दर किलोमीटरनंतर गती कमी होण्यासाठी ‘रंबलिंग स्ट्रिक’ प्रकारचे गतीरोधक अशा काही उपाययोजना करण्यात आल्याची माहिती भुसे यांनी यावेळी दिली.