सांगलीहून मुंबईला जाणाऱ्या बसला साताऱ्यात आग
४० प्रवासी थोडक्यात बचावले
सातारा दि. ७ (प्रतिनिधी) - मिरजहून मुंबईकडे प्रवासी घेऊन निघालेल्या ट्रॅव्हल्स कराड तालुक्यातून जाणाऱ्या पुणे-बंगळूर आशियाई महामार्गावर अचानक आग लागल्याने बस जळून खाक झाली. तासवडे टोलनाका (ता. कराड) येथे पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली. बसमधून ४० प्रवाशी हज यात्रेला जाण्यासाठी निघाले होते. या घटनेमुळे टोलनाका परिसरात प्रवाशांसह वाहनधारकांची धावपळ उडाली. प्रसंगावधान राखल्याने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी, डॉल्फीन कंपनीची खासगी प्रवासी वाहतूक बस (एमएच ०३-सीपी- ४५०० ) ही रात्री प्रवासी घेऊन मिरजहून मुंबईकडे निघाली होती. यावेळी कराड येथे ट्रॅव्हल्सचा टायर पंक्चर झाल्याने तिथे थांबली होती. तेथून ती पहाटे पुढे निघाली होती. काही अंतरावर पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास तासवडे टोलनाक्यानजीक आल्यानंतर या बसला पाठीमागील बाजूस आग लागल्याची माहिती पाठीमागून येणाऱ्या वाहनधारकांनी बसचालकास दिली. आग लागल्याचे लक्षात येताच बस बाजूला घेऊन संबंधित चालक व पोलिसांनी प्रवाशांना सुरक्षित बाहेर काढलं.
तेथील उपस्थितांनी आगीची माहिती कराड नगरपालिकेच्या अग्निशामक विभागाला दिली. त्यानंतर काही वेळात अग्निशामक गाडी घटनास्थळी दाखल झाली होती. अग्निशामक दलाने अवघ्या पाऊण तासात आगीवर नियंत्रण मिळवल्याने मोठी दुर्घटना टाळली.
यावेळी तळबीड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल योगेश भोसले, प्रविण गायकवाड, होमगार्ड खडके, आकाश माने घटनास्थळी उपस्थित होते. या घटनेची माहिती तळबीड पोलिस घेत आहेत. सुदैवाने, या आगीच्या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र ट्रॅव्हल्सचे मोठे नुकसान झाले आहे.दुर्घटनेत जीवितहानी झाली नसली, तरी पुन्हा एकदा खासगी बसेसच्या सुरक्षिततेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. या घटनेची माहिती हज यात्रेला निघालेल्या नातेवाईकांना कळताच त्यांनी तातडीने घटनास्थळी येऊन यात्रेकरूंना पुढील प्रवासासाठी सोय करून दिली.