बळीराजाची चिंता वाढली,
विदर्भात सोयाबीनच्या दरात मोठी घसरण
अकोला दि. ६ (प्रतिनिधी) - शेतकऱ्याच्या चिंतेत वाढ होणार आहे. गेल्या काही दिवसांपासून विदर्भात सोयाबीनच्या दरात सातत्यानं घसरण होत असल्याचं दिसून येत आहे. अकोला जिल्ह्यातील अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत गेल्या चार दिवसात सोयाबीन दरात ४१० रुपयांनी क्विंटलमागे घसरण झाली आहे. डिसेंबरच्या पहिल्या दिवशी सोयाबीनला जास्तीत जास्त ५ हजार १६५ रूपये तर सरासरी भाव ४ हजार ९०० रुपये इतका होता, आज ६ डिसेंबर रोजी सोयाबीनला कमाल भाव ४ हजार ७५५ रूपये असून सरासरी भाव ४ हजार ५८० रूपयांपर्यंत असून बाजारात सोयाबीनची आवक वाढत आहे. कारण सोयाबीन दरात घसरण पाहता आता शेतकऱ्यांनी घरात साठवून ठेवलेलं सोयाबीन बाजारात विक्रीसाठी आणत असल्याचे दिसून येत आहे.
या हंगामात सोयाबीनचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घटलं आहे. त्यात सोयाबीनला दर कमी मिळतोय. त्यामुळ बळीराजा गरजेपुरते सोयाबीन विकून बाकीचे घरात ठेवत आहे. मात्र सोयाबीन दरामध्ये होत असलेली घसरण बघता शेतकऱ्यांनी आता साठवलेलं सोयाबीन बाहेर काढलं आहे. अकोल्याच्या बाजारात सोयाबीनची आवक दिवसेंदिवस वाढत आहे. काल पाच डिसेंबर रोजी ४ हजार २३३ एवढी क्विंटल सोयाबीन खरेदी झालंय. तर आज बुधवारी २ हजार ६४० क्विंटल सोयाबीनची आवक झाली आहे. गेल्या सहा दिवसांत १४ हजार ५१८ क्विंटल अकोला बाजार खरेदी झालं आहे.
दरम्यान, यंदा सोयाबीनमधून शेतकऱ्यांना फारसे उत्पादन हाती काही लागले नाही. त्यात सोयाबीन दरवाढीच्या प्रतीक्षेत असलेला बळीराजाच्या प्रतीक्षाचा संयमाचा बांध फुटलाय. कारण आता सोयाबीन दरात घसरण सत्र कायम असल्याचे दिसून येत आहे. क्विंटलमागे ४ हजार ८०० रूपयांच्या आत सोयाबीनला भाव आहे, त्यामुळे सोयाबीन भावात आणखी वाढ होण्याची शेतकऱ्यांना आशा राहली नाहीये. अखेर नाईलाजाने शेतकऱ्यांना आपला शेतमाल बाजारात विक्रीसाठी आणावं लागत आहे.
दरम्यान या हंगामातील सोयाबीनला विदर्भातल्या अकोला जिल्ह्यात अकोला कृषी उत्पन्न बाजार समितीत २२ नोव्हेंबर रोजी कमीत कमी ४ हजार २०० पासून ५ हजार २९५ रुपये इतका भाव होता. सरासरी भाव ५ हजार रूपयांपर्यत होता. हा दर काही दिवस स्थिर राहिला असून त्यानंतर पुन्हा सोयाबीनच्या दरात घसरण सुरू झाली.
परंतु डिसेंबरच्या पहिल्याच दिवशी सोयाबीनला कमीत कमी ४ हजार १५० ते ५ हजार १६५ रूपये भाव मिळाला असून सरासरी भाव ४ हजार ९०० रूपये होता. तेव्हापासून बाजारात सोयाबीनची आवक वाढत गेली. त्यानंतर सोयाबीनच्या दरात घसरण सुरू झाली आणि काल ५ डिसेंबर रोजी सोयाबीनला किमान भाव ४ हजार पासून कमाल भाव ४ हजार ७८० तर सरासरी भाव ४ हजार ४०० रूपयांपर्यत होता. परंतु आज बुधावर रोजी कमाल दर २५ रुपयांनी खाली आले आहे. दरम्यान ४ हजार २०० ते कमाल भाव ४ हजार ७५५ रूपये तर सरासरी दर ४ हजार ५८० रूपये क्विंटलमागे सोयाबीन भाव मिळाला आहे.
सद्यस्थितीत शेतकऱ्यांच्या कापूस व सोयाबीनसारख्या पिकांना भाव नाहीये, त्यामुळ बळीराजा आर्थिक अडचणीत सापडला. याला कारण ठरलंय निसर्गाचा लहरीपणाचा फटका. या हंगामात पावसाची मर्जी, मध्येच मारलेली पावसानं दडी, शेतकऱ्यांसमोर आलेली दुबार पेरणी वेळ, ती करूनही म्हणावे तसे पीक हाती आलेच नाही. कारण यंदा सोयाबीनवर 'यलो मोझॅक'चे आक्रमण झालं, त्यामुळ सोयाबीन उत्पादनाला फटका बसला. आणि हाती एकरी ३ ते ४ तर काहींनी २ ते ३ क्विंटल सोयाबीन झालं. त्यामूळ उत्पादन खर्च निघेल एवढाही दर मिळेनासे झालाय. तर कापूस फारसा समाधानकारक झाला नाहीये. आता अतिवृष्टीमुळे त्याचही मोठ्या प्रमाणात नुकसान झालंय. त्यात सणासुधीचा काळ आणि डोक्यावर असलेलं कर्ज फेडण्यासाठी बाजारात मिळेल त्या भावात विकण्याशिवाय पर्याय राहिला नव्हता. त्यामुळ शेतकऱ्यांना दुहेरी फटका सहन करावा लागला.