एसटी बस व मालवाहू वाहनाची धडक;
विद्यार्थ्यांसह प्रवासी जखमी
बुलढाणा दि.५ (प्रतिनिधी) - लाखनवाडा तालुका खामगाव ते उदयनगर तालुका चिखली मार्गावरील पिंप्री कोरडे नजीक आज, मंगळवारी दुर्घटना घडली.भरधाव मालवाहू वाहन व महामंडळाच्या बसची समोरासमोर धडक झाल्याने दोन्ही चालक गंभीर जखमी झाले. तसेच बसमधील विद्यार्थी व प्रवासी जखमी झाले.
प्राप्त माहितीनुसार, खामगाव आगाराची बस लाखनवाड्यावरून उदयनगरकडे जात होती. यावेळी बसमध्ये एकूण ४७ प्रवाशी होते. त्यामध्ये २० पासधारी शाळकरी विद्यार्थी होते. पिंपरी कोरडे गावानजीक विरुद्ध दिशेने येणाऱ्या मालवाहू वाहनाची आणि एसटी बसची समोरासमोर धडक झाली. अपघातानंतर बस रस्त्याच्या खाली गेली. अपघातात दोन्ही वाहनांचे मोठे नुकसान झाले आहे. एसटी बसच्या चालकाला अधिक मार लागला असून काही प्रवाशी किरकोळ जखमी आहेत. बसचालकाला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले आहे.