आळंदीला जाणाऱ्या पालखीत भरधाव कंटेनर घुसला, भीषण अपघातात चार वारकऱ्यांचा मृत्यू
पुणे, दि. ३ (प्रतिनिधी) - नाशिक - पुणे महामार्गावर भीषण अपघाताची एक घटना घडली आहे. या अपघातात चार जणांचा दुर्दैवी मृत्यू तर आठ जण जखमी असल्याची माहिती समोर आली आहे. शिर्डीहून आळंदीला जाणाऱ्या पालखीत कंटेनर घुसल्याने ही अपघाताची घटना घडली आहे. पायी चालणाऱ्या वारकऱ्यांचा मृत्यू झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे.
शिर्डी येथील काशिकानंद महाराज यांची पायी दिंडी शिर्डीहून आळंदीकडे जात होती. या दिंडीत भरधाव वेगात येणारे एमएच १२ व्हिटी १४५५ कंटेनर घुसल्याने भीषण अपघात झाला आणि या अपघातात चार वारकऱ्यांचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर आठ वारकरी गंभीर जखमी झाले आहेत. या अपघातात कंटेनरचा चालक मद्यपान करून वाहन चालवत असल्याची प्राथमिक माहिती समोर आली असून त्याचा या वाहनावरील नियंत्रण सुटल्याने हा अपघात झाल्याचे सांगितलं जात आहे. अशी माहिती मिळाली आहे.
या अपघातानंतर घटनास्थळी युद्ध पातळीवर मदतकार्य सुरू होते. आजूबाजूच्या नागरिकांनी तात्काळ मदत करत जखमींना रुग्णालयात दाखल केले. कंटेनर चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं असून संतप्त नागरिकांनी या कंटेनरची तोडफोड केली आहे. अपघातात वारकरी ठार झाल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त केली जात आहे. या अपघातातील जखमी आणि मयतांची ओळख पटली असून त्यांची नावे देखील समोर आली आहेत. मयतांची नांव १. बाळासाहेब अर्जुन गवळी (रा.मढी ता. कोपरगाव), २. बबन पाटीलबा थोरे (चोपदार) (रा. द्वारकानगर, शिर्डी), ३. भाऊसाहेब नाथा जपे (रा.कनकोरी, ता. राहता), ४. ताराबाई गंगाधर गमे (रा.कोऱ्हाळे, ता. राहता) अशी आहेत.