हिंगोलीत अवकाळी पावसामुळे साखर भिजली;
तब्बल दोन कोटींचे नुकसान
हिंगोली दि. २९ (प्रतिनिधी) - अवकाळी पाऊस शेतकऱ्यांसाठी नेहमीच नुकसानकारक ठरतो. हिंगोली जिल्ह्यात मात्र तो चक्क पूर्णा सहकारी साखर कारखान्यासाठी हानिकारक ठरला आहे. या पावामुळे कारखान्याची तब्बल 500 मेट्रिक टन इतकी साखर चक्क पाण्यात भिजली आहे. ज्यामुळे कारखान्याचे जवळपास 200 कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचे समजते. अचानक आलेला पाऊस इतका मुसळधार होता की, त्यामुळे पाणी चक्क कारखान्याच्या गोडाऊनमध्ये शिरले. ज्यामुळे साखर भिजली आहे. त्यातील बरिचशी साखर पाण्यात विरघळल्याने गोडाऊनमध्ये पाक पाहायला मिळत होता.
पावसाचे पाणी कारखाना परिसरात शिरल्यामुळे गाळप प्रक्रियेलाही 24 तासांचा विलंब झाला. परिसरात अस्वच्छता पाहायला मिळत असल्याने पुढील काही दिवस गाळप प्रक्रियेतही अडथळा निर्माण होण्याची भिती व्यक्त होत आहे. हिंगोली जिल्ह्या पाठिमागील दोन दिवस अवकाळी पाऊस बरसत आहे. आज सलग तिसऱ्या दिवशीही पावसाने जोरदार हजेरी लावली. या पावसामुळे शेतकऱ्यांचेही अतोनात नुकसान होत आहे. शेतात उभी असलेली द्राक्षे, कापूस, तूर, हरभरा, ज्वारी यांसारकी पिके आडवी होत आहेत.
अवकाळी पावसामुळे केवळ शेतकऱ्यांच्या पिकाचेच नव्हे तर त्याच्या पुढील वर्षाचे नियोजनही कोलमडते. शेतातील पिकावर शेतकऱ्यांचे आर्थिक गणित अवलंबून असते. त्यासोबतच शेतीला जोडून असलेल्या पशुधन आणि दुग्धव्यवसायाचेही व्यवस्थापन त्याने केलेले असते. शेतातील पिके काढून घेतल्यावर उरलेला कडबा, वैरण, सुका चारा शेतकरी साठवण करुन ठेवत असतो. पुढील वर्षभर जर हा चारा साठवून ठेवायचा असेल तर तो मुबलक प्रमाणात उपलब्धही असावा लागतो. अवकाळी पावसाने जर शेतातील ओल्या पिकाचेच नुकसान झाले तर सुका चारा साठवायचा कसा? असा भलताच प्रश्न शतकऱ्यासमोर उभा राहतो.
दरम्यान, साखर हा सामान्य माणसाच्या दैनंदिन आहारातील मुख्य घटकांपैकी एक महत्त्वाचा पदार्थआहे. आपल्या घरात येणारी साखर ही जरी स्फटीक रुपात आपल्याला दिसत असली तरी त्यापाठीमागे बरीच मोठी प्रक्रिया असते. शेतकरी शेतात ऊस पिकवतो. तो वाढवतो, जपतो. पुढे त्याची कापणी करुन तो ऊस कारखान्यांना (साखर) घातला जातो. कारखान्यात आल्यावर त्या ऊसावर मोठ्या प्रमाणावर प्रक्रिया केली जाते. जी बऱ्याच प्रमाणात यंत्रवत आणि मानवी श्रम वापरुन राबवली जाते. ऊसापासून साखर बनविण्याच्या प्रक्रियेमुळे शेतकऱ्यांनाही चांगले पैसे मिळतात. त्यामुळे ऊसाचा भाव हा राज्यातील शेतकऱ्यांमध्ये नेहमीच उत्सुकतेचा आणि भावनेचा विषय राहिल्याचे आपणास पाहायला मिळते.