रिल्सस्टार तरुणाला रील बनवणं चांगलंच भोवलं
धुळे.दि.२८(प्रतिनिधी) - सध्याच्या तरुणाईला सोशल मीडियाचं प्रचंड वेड लागलं आहे असं म्हटलं तर तरी आतिशोयोक्ती ठरणार नाही. सोशल मीडियावर कमी दिवसात प्रसिद्ध होण्यासाठी अनेक जण वेगवेगळ्या प्रकारची रील्स, व्हिडीओ तयार करत असतात. लाईक्स, कमेंट्स मिळवण्याच्या नादात तरुण- तरुणी असे अनेक प्रकार करतात, ज्यामुळे अनेकांचा त्यांच्या या कृत्याचा राग अनावर होत असतो. मात्र तरुण-तरुणी रील बनत असताना इतर कोणाचाही विचार करत नाही ज्यामुळे सामाजिक परिस्थिती बिघडेल याचे देखील ते भान ठेवत नाही आणि नको त्या चुका करून बसतात. असाच एक प्रकार धुळ्यात घडला आहे. सार्वजनिक ठिकाणी रील बनवणे एका तरुणाला चांगलंच महागात पडलं आहे.
नेमका प्रकार काय ?
धुळे शहरातील देवपूर बस स्थानकावर रविवारी एका तरुणाने मुलींची छेडछाड करण्याच्या उद्देशाने तयार केलेला एक रील व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडीओ काही वेळातच चांगलाच व्हायरल झाला. या व्हिडीओत हा तरुण महाविद्यालयीन विद्यार्थिनींसमोर येऊन एका हिंदी गाण्यावर नृत्य करीत असल्याचे दिसून आले, त्यानंतर नेटकर्यांनी या तरुणाचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल करत याच्यावर कडक कारवाई करण्याची मागणी करण्यात केली होती.
पोलिसांनी काय केलं ?
हा प्रकार घडल्यानंतर धुळे पोलिसांनी या तरुणाचा शोध घेऊन एलसीबीच्या पथकाने नरडाणा गावातून या तरुणाला ताब्यात घेतले आहे. राज पवार असे या तरुणाचे नाव असून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतल्यानंतर ज्या ठिकाणी त्याने हा व्हिडिओ तयार केला त्याच देवपूर बस स्थानक परिसरात नेऊन या विद्यार्थिनींसमोर त्याला पोलिसांनी चांगलीच अद्दल घडवली आहे. ज्या ठिकाणी मुलींची छेड काढण्याच्या उद्देशाने हा व्हिडिओ बनवला होता त्या ठिकाणी घेऊन जात सर्व लोकांसमोर त्याची परेड काढत त्याला या सर्व मुलींसमोर माफी मागायला सांगितले यावेळी एका तरुणीने या तरुणाच्या चांगल्या कानशीलात लगावली असल्याचे देखील यावेळी बघायला मिळाले.