रायगडचे किनारे सलग सुट्यांमुळे पर्यटकांच्या गर्दीने गजबजले
अलिबाग दि.१९ (प्रतिनिधी) - मुंबई पुण्यापासून जवळ असलेले रायगडचे किनारे सलग सुट्यांमुळे पर्यटकांच्या गर्दीने फुलून गेले आहेत. अलिबागसह मुरुड, काशीद, नागाव, दिवेआगर, श्रीवर्धनच्या किनाऱ्यांवर पर्यटकांची तोबा गर्दी दिसून येत आहे.
सलग चार दिवस सुटटी मिळाल्याने लोकांनी फिरायला जाण्याचा बेत आखला. त्यासाठी रायगडच्या किनाऱ्यांना मोठी पसंती दिल्याचे पहायला मिळते. मुंबईहून जवळ असलेल्या तसेच मिनी गोवा म्हणून पर्यटकांची प्रमुख पसंती असलेल्या अलिबाग व मुरुडकडे वेळेची व इंधनाची बचत करत मांडवामार्गे जलप्रवासाने पर्यटक दाखल झाले आहेत. सागरी सफरीचा आनंद घेत इथं आलेले पर्यटक मनसोक्त हुंदडत इथल्या निसर्ग सौंदर्याचा अनुभव घेत आहेत. समुद्र स्नानाबरोबरच एटिव्ही राईड, जेट स्की, बनाना राईड यासारख्या वेगवेगळ्या वॉटर स्पोर्ट्सचा आनंद घेत आहेत. ताज्या मासळी वर ताव मारत आहेत. उंट सवारी घोडा गाडी यामुळे बच्चेकंपनीही खुश आहे.
या निमित्ताने रायगडच्या सागरी पर्यटन हंगामाला सुरुवात झाली आहे. पर्यटकांच्या आगमनाने व्यावसायिक देखील खुश आहेत. इथल्या हॉटेल व्यावसायिकांबरोबरच घरगुती कॉटेजेस, छोटेमोठे विक्रेते यांना चांगला व्यवसाय उपलब्ध झाला आहे. पर्यटकांची ही रेलचेल सुट्या संपेपर्यंत अशीच कायम राहणार आहे.