दहा दिवसानंतर नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागास अखेर यश
धुळे.दि.३०(प्रतिनिधी) - तब्बल दहा दिवसांपासून नरभक्षक बिबट्याचा सुरू असलेला शोध अखेर आज (साेमवार) संपला. या नरभक्षक बिबट्याला वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना व अधिकाऱ्यांना जेरबंद करण्यात यश आले आहे. बिबट्याला जाळ्यात पकडून त्यास वनकर्मचा-यांनी कैद केले आहे.
या नरभक्षक बिबट्याने जवळपास तीन लहान चिमुकल्यांचा बळी देखील घेतला आहे. त्यामुळे वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या नरभक्षक बिबट्याला पकडण्यासाठी वन अधिकाऱ्यांना आदेशित केलेले होते. त्यानंतर जवळपास दहा दिवसांच्या अथक प्रयत्नानंतर वन विभागाला या नरभक्षक बिबट्याला जाळ्यात अडकवण्याच्या प्रयत्नांना यश आले आहे.
धुळे तालुक्यात जवळपास दहा दिवसांपासून या नरभक्षक बिबट्याने चांगलाच धुमाकूळ घातला होता. त्यामुळे धुळे तालुक्यात बहुतांश ठिकाणी शेतीची कामे जोरात सुरू असताना देखील शेतकरी शेतात जाण्यास घाबरत होते. परंतु आता या नरभक्षक बिबट्याला वनविभागाच्या अधिकाऱ्यांनी व कर्मचाऱ्यांनी जेर बंद केल्यानंतर परिसरातील नागरिकांनी व शेतकऱ्यांनी सुटकेचा निश्वास सोडला आहे.
आज पहाटे साडेचार वाजेच्या सुमारास वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी व अधिकाऱ्यांनी या नरभक्षक बिबट्याला भुलीचे इंजेक्शन शूट करून त्याला बेशुद्ध केले. त्यानंतर या नरभक्षक बिबट्याला जेरबंद करण्यात वनविभागाच्या अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना यश आले आहे.