वाढत्या थंडीमुळे स्थलांतरित पक्ष्यांचे
गोंदिया जिल्ह्यायात आगमन
गोंदिया दि. ३० (प्रतिनिधी) - अलीकडॆच राज्यात थंडीचे दिवस चालू झाले आहेत .त्यातच तलावांचा जिल्हा म्हणून गोंदिया जिल्ह्याची सर्वदूर ओळख आहे.गोंदिया जिल्ह्यात वाढत्या थंडीमुळे स्थलांतरित पक्ष्यांचे आगमन सुरू झाले आहे. त्यामुळे पक्षीप्रेमींचा उत्साह आणि धरणे व तलावांचे सौंदर्य वाढू लागले आहे. अनुकूल वातावरण आणि हवे असलेल्या अन्नाची उपलब्धता लक्षात घेऊन हे पक्षी प्रवास करीत असतात.
नोव्हेंबर, डिसेंबर आणि जानेवारी महिन्यात स्थलांतरित पक्षी हजारो किलोमीटर अंतर कापून गोंदिया जिल्ह्यात येतात. तर वसंत पंचमीपासून त्यांचा परतीचा प्रवास सुरू होतो. येथे येणाऱ्या स्थलांतरित पक्ष्यांमध्ये ग्रेलॉक गुग्ज, कॉमन पोचार्ड, रेड क्रेस्टेड पोचाई, मलाई, गर्गनी, आर्क्टिक टर्न, सायबेरियन स्टॉर्क, ब्लॅक-टेलेड गॉडविट, कॉमन डिल, सायबेरियन क्रेन, नॉर्दर्न पिनटेल, ओपन बिल स्टॉर्क ब्लॅक हेड, ब्लॅक हेड एम्बिस, पांढरा स्तन, पट्टे स्टार्क, कार्मोरंट, पॅरामपल मोर्हेन, वॉटरहेन, राखाडी बगळा, कमी पंख असलेला गरुड यांचा समावेश असतो. वनांनी वेढलेल्या तलावात बहुतांश पक्षी दिसतात.
नवेगावबांध, नागझिरा, चुलबंद प्रकल्प, पुजारीटोला, बाजारटोला, परसवाडा, झिलमिली, आमगावचा नवतलाब, महादेव टेकडी परिसर, झालिया तलाव आणि अंजोरा तलाव येथे परदेशी पक्ष्यांचा मुक्काम असतो. गेल्या काही दिवसांपासून परदेशी पक्ष्यांवर शिका-यांची वक्रदृष्टी पडली आहे. यावर वनविभाग आणि वन्यजीव विभागाकडून ठोस उपाययोजना आणि कसोशीचे प्रयत्न होणे आवश्यक आहे.
परदेशी पक्ष्यांचे संरक्षण आणि त्यांचा वावर असलेल्या तलावांच्या स्वच्छतेच्या नावावर वारेमाप पैसा खर्च केला जातो. मात्र, प्रदूषण दिवसेंदिवस वाढतच चालले आहे, तर शिकारींच्या घटनांमध्येही झपाट्याने वाढ होत आहे. परिणामी स्थलांतरित पक्ष्यांच्या संख्येत घट दिसून येत आहे. तलाव संकुलात राहणाऱ्या नागरिकांनीही पक्ष्यांच्या संरक्षणासाठी सहकार्य करावे, जेणेकरून भक्षकांसह प्रदूषण होणार नाही, असे आवाहन पक्षी मित्र व मानद वन्यजीव सदस्य मुकुंद धुर्वे यांनी केले आहे.